गोंदिया : नियमित पाणीपट्टी भरूनदेखील शेतकऱ्याला कालव्याचे पाणी देण्यास नवेगावबांध पाटबंधारे विभागाकडून मागील वर्षभरापासून टाळटाळ केली जात आहे. त्यामुळे आपल्या हक्काचे पाणी आपल्याला मिळून शेतीत उत्पादन घेता यावे, यासाठी मागील वर्षभरापासून एक शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय आणि पाटबंधारे कार्यालयाच्या पायऱ्या झिजवत आहे. पण, अद्यापही त्याच्या तक्रारीची दखल घेऊन समस्या मार्गी लावण्यात आली नाही.
शासकीय काम आणि महिनाभर थांब असे म्हटले जात असले, तरी वर्षभर प्रतीक्षा करून प्रशासनाकडून कुठलीच कारवाई केली जात नसल्याने शेतकऱ्याला शेती करण्यापासून वंचित राहावे लागत आहे. नंदलाल सखाराम चांदेवार, रा. गोंडउमरी, ता. सडक अर्जुनी असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे. चांदेवार यांची सडक अर्जुनी तालुक्यातील कोकणा येथे २.४४ हेक्टर आर शेती आहे. या शेतीला नवेगावबांध पाटबंधारे विभागांतर्गत येणाऱ्या कालव्याचे पाणी देणे लागू आहे. यासाठी ते नियमित पाणीपट्टीदेखील भरतात. चांदेवार यांनी नवेगावबांध पाटबंधारे विभागाकडे अर्ज करून रब्बी हंगामासाठी कालव्याचे पाणी नियमानुसार देण्याची मागणी केली. मात्र, या विभागाने कालव्याचे पाणी न दिल्याने त्यांना उत्पन्न घेण्यापासून वंचित राहावे लागले. रब्बी हंगामात लावलेल्या पिकासाठी पाणी न मिळाल्याने त्यांना पीक घेण्यापासून वंचित राहावे लागले. त्यामुळे झालेली नुकसानभरपाई मिळावी व नियमानुसार कालव्याचे पाणी देण्यात यावे. याकरिता जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि पाटबंधारे विभाग यांच्याकडे अनेकदा पत्रव्यवहार केला. तसेच प्रत्यक्षात जाऊन तक्रारसुद्धा केली. याला वर्षभराचा कालावधी लोटूनही त्यांच्या तक्रारीची अद्यापही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे चांदेवार यांची पायपीट कायम असून प्रशासन दखल घेत नसले, तरी लोकप्रतिनिधी याची दखल घेऊन कारवाई करतील, असा सवाल चांदेवार यांनी केला आहे.