सालेकसा : तालुक्यातील कोटजंभुरा येथील डहारे परिवारातील लोकांनी आपल्या घरासमोरील सिमेंट रस्त्यावर अतिक्रमण करुन रस्ता बंद केल्याने त्यांच्या समोरील माहुले परिवाराच्या लोकांचे घराबाहेर येणे-जाणे बंद केले आहे. त्यामुळे माहुले परिवारातील लोकांना शेती वाडीच्या कामात जाण्यास मोठी अडचण निर्माण झाली आहे. मात्र याची तक्रार संबंधित अधिकाऱ्याकडे वारंवार करुनही प्रकरणाचा तोडगा काढला नाही.
काेटजंभुरा येथे माहुले आणि डहारे परिवार यांच्यात मागील काही वर्षापासून वैचारिक मतभेद आहेत. यंदा झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत दोन्ही परिवारातील उमेदवार एकमेकांच्या विरुद्ध उभे होते. यात माहुले कुटुंबातील उमेदवार निवडून आला आणि सुदैवाने गावातील सरपंच सुद्धा झाला. ही बाब डहारे परिवाराच्या पचनी पडली नाही. दरम्यान काही वर्षापूर्वी माहुले कुटुंबातील पाच भावापैकी एक दीपलाल माहुले यांनी वडिलोपार्जित जुने घराच्या मागील वाडीत नवीन घर बांधले. ते घर मागील सिमेंट रस्त्याला लागून असल्याने त्यांनी आपले येणे-जाणे तिथून सुरु केले. डहारे कुटुंबाच्या घरासमोरचा रस्ता सुरु झाल्याने त्यांना आवडले नाही. तसेच जी जागा ज्यावर रस्ता बांधकाम झाला आहे. डहारे परिवाराचीच आहे असे त्यांचे म्हणणे आहे. म्हणून आपल्या जागेवरुन आम्ही येणे-जाणे करु देणार नाही असे म्हणून डहारे परिवाराने रस्त्यावर दीपलाल माहुले यांच्या दारासमोर काटेरी झाडे व इतर साहित्य टाकून रस्ता बंद करुन ठेवला आहे. यासंबंधी माहुले कुटुंबातील लोकांनी तसेच गावकऱ्यांनी रस्ता उघडण्यासाठी सभा बोलावून डहारे यांना आग्रह केला. परंतु त्यांनी रस्ता उघडण्यास नकार दिला व सभेत आलेल्या लोकांना घरी जाण्यास सांगितले. या समस्येची तक्रार दीपलाल माहुले व शर्मिला माहुले यांनी तहसीलदार, ठाणेदार आणि बीडीओ यांना सुद्धा केली. परंतु राजकीय दबावापोटी या समस्येवर कोणताही तोडगा काढण्यात येत नसल्याचा आरोप केला.
कोट
जिथपर्यंत पक्का सिमेंट रस्ता आणि नाली बांधकाम ग्रामपंचायत मार्फत करण्यात आले आहे. तिथपर्यंत ग्रामपंचायतचे अधिकार क्षेत्र आहे. त्यामुळे सिमेंट रस्त्यावर मिळणारा रस्ता अडविणे चुकीचे आहे. या प्रकरणावर महसूल विभागाने दखल घेऊन तोडगा काढावा.
-शर्मिला माहुले,सरपंच कोटजंभुरा