गोंदिया : शेतकऱ्यांनी कृषी विभागाचे मार्गदर्शन घेऊन आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून आपले कृषी उत्पादन आणि उत्पन्न वाढवावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी केले.
कृषी संजीवनी मोहिमेच्या निमित्ताने आमगाव येथील तालुका बीज गुणन केंद्रात आयोजित शेतकरी प्रशिक्षणात सोमवारी (दि.२१) ते बोलत होते. जिल्ह्यात २१ जून ते १ जुलै या कालावधीत कृषी विभागामार्फत कृषी संजीवनी मोहीम आयोजित करण्यात आली आहे. या कालावधीत प्रत्येक दिवशी शेतकऱ्यांना विविध बाबींवर तांत्रिक मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यामध्ये पट्टा पद्धतीने धान लागवड, धान लागवडीसाठी ड्रम सीडरचा वापर, बीज प्रक्रिया, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतील फळबाग लागवड, एकात्मिक कीड व्यवस्थापन आदींचा समावेश आहे. या मोहिमेंतर्गत आमगाव येथे सोमवारी (दि.२१) झालेल्या कार्यक्रमात तालुक्यातील अनेक प्रगतीशील शेतकरी उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांना ऍझोला उत्पादन आणि त्याचा भात शेतीमध्ये वापर, युरिया डीएपी ब्रिकेटचा वापर, दशपर्णी अर्क तयार करणे इत्यादींबाबत प्रात्यक्षिकाद्वारे तांत्रिक मार्गदर्शन करण्यात आले. तसेच महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेत फळबाग लागवड करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना कलमे व रोपे उपलब्ध होण्यासाठी परमिटचे वाटप करण्यात आले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गणेश घोरपडे यांनी,शेतकऱ्यांना अँड्रॉईड मोबाईल फोनवर कृषक ॲप डाऊनलोड करून त्याच्याद्वारे रासायनिक खतावरील खर्च कमी करण्याबाबत मार्गदर्शन केले. संचालन आमगाव तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सुषमा शिवणकर यांनी केले. उपविभागीय कृषी अधिकारी मंगेश वावधने, तालुका कृषी अधिकारी सुरज जाधव, तहसीलदार दयाराम भोयर तसेच कृषी विभाग आणि आत्मा अंतर्गत काम करणारे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.