लोकमत न्यूज नेटवर्क
सडक-अर्जुनी : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केवळ धानाची शेती न करता, मका व ऊसाची शेती करून आधुनिक शेतीकडे वळावे. तसेच म. ग्रा. रो. योजनेंतर्गत ग्रामपंचायतीने लवकरात लवकर आराखडा तयार करून सादर करावा. त्यानुसार आपण गावातील विकास व शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे प्रतिपादन आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी केले.
तालुक्यातील ग्राम मोहाडी येथे विकास आधारभूत सहकारी संस्थेच्या शासकीय आधारभूत किंमत धान खरेदी केंद्राच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी डॉ. झामसिंह बघेले होते. प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच रजनी धपाडे, केवल बघेले, सरपंच सोमेश्वर रहांगडाले, टी. बी. कटरे, डॉ. सी. पी. येळे, दुलीचंद बघेले, योगराज भोयर, मदनलाल बघेले, सुनील कापसे, धनेसार तिरेले, भाऊलाल चव्हाण उपस्थित होते. झामसिंह बघेले यांनी आमदार चंद्रिकापुरे रोजगार हमी योजनेचे राज्याचे अध्यक्ष असल्यामुळे जिल्ह्यासाठी ही अभिमानाची बाब असून, संपूर्ण राज्याला त्याचा फायदा होणार असल्याचे सांगितले. प्रास्ताविक संस्थेच्या अध्यक्ष यु. टी. बिसेन यांनी केले. सूत्रसंचालन एच. टी. बिसेन यांनी केले तर एच. के. बिसेन यांनी आभार मानले. या कार्यक्रमासाठी संस्थेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.