केशोरी : या वर्षीचा खरीप हंगाम तोंडावर आला असून धानाची पेरणी करताना कोणत्याही शेतकऱ्याने घाई करू नये. शेतकरी विनाकारण धानाची पेरणी करण्यासाठी अत्यंत घाई करताना दिसून येतात. बियाण्यांची निवड करताना शेतकऱ्यांनी सतर्कता बाळगणे अत्यंत महत्त्वाचे असून बियाण्यांची उगवणक्षमता तपासूनच बी-बियाणे खरेदी करावे, असा सल्ला कृषी सहायक सागर होलगिऱ्हे यांनी दिला आहे.
खरीप हंगामाच्या तोंडावर परिसरातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी त्यांनी, शेतकऱ्यांनी अधिकृत बियाणे विक्रेत्यांकडून बियाणे खरेदी करावे, बनावट बियाण्यांची खरेदी टाळण्यासाठी खासगी अनधिकृत विक्रेत्यांकडून धान बियाणे खरेदी करू नये. अधिकृत विक्रेत्यांकडून पक्क्या पावतीसह धान बियाणे खरेदी करावे. पावतीवर धान बियाण्यांचा पूर्ण तपशील असणे आवश्यक आहे. तसेच खरेदी केलेले बियाणे, वेष्ठन, पिशवी टॅग, खरेदी पावती व त्यातील थोडे बियाणे पिकाची कापणी होईपर्यंत जपून ठेवावे. खरेदी केलेल्या बियाण्यांचे पाकीट सील व मोहरबंद असल्याची खात्री करावी. बियाणे पाकिटावर अंतिम मुदत तपासावी. कमी वजनाच्या निविष्ठा तसेच छापील किमतीपेक्षा जास्त किमतीने विक्री केल्यास त्याची कृषी विभागाकडे तक्रार करावी. इत्यादी बाबींची शेतकऱ्यांनी खबरदारी घेऊन बियाण्यांची खरेदी करताना शेतकऱ्यांनी काळजी घेणे गरजेचे आहे, असेही होलगिऱ्हे यांनी सांगीतले.