परिणय फुके : चावडी वाचन विशेष मोहीमलोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : सामान्य जनतेला संगणकाच्या एका बटणावर संपूर्ण माहिती उपलब्ध होवून पारदर्शी कारभार व्हावा यासाठी शासनाने डिजिटल महाराष्ट्र ही योजना कार्यान्वित केली. महसूल विभागाने यामध्ये पुढाकार घेऊन संपूर्ण तलाठी दस्तावेज संगणीकृत करण्याचा कार्यक्रम हाती घेतलेला आहेत. शेतकऱ्यांनी संगणीकृत सातबारा, नमुना ८ अचूक असल्याची खात्री करण्याकरिता महाराष्ट्र शासनाने अचूक संगणीकृत सातबारा, नमुना ८ चावडी वाचन विशेष मोहीम राबविली आहे. या मोहिमेच्या अंतर्गत शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त लाभ घेवून महसूल दस्तावेज तपासून खात्री करून घ्यावे, असे आवाहन गोंदिया-भंडारा विधानपरिषदेचे आ. परिणय फुके यांनी केले.तिरोडा तालुक्यातील नवेझरी येथे चावडी वाचन मोहिमेचा शुभारंभ करताना ते मार्गदर्शन करीत होते. महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाद्वारे ई-फेरफार कार्यक्रम मोठ्या प्रमाणात घेण्यात येत आहेत. जिल्ह्यातील जवळपास ९८ टक्के सातबारा संगणीकृत करण्यात आले. त्यामुळे महसूल विभागातील कर्मचाऱ्यांचे परिणय फुके यांनी आभार मानले.त्याचप्रकारे शासन व नवेझरी ग्राममंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने नवेझरी गाव डासमुक्त अभियान कार्यक्रम हाती घेवून घरातील व गावातील सांडपाणी जमिनीमध्ये कसे साठवता येईल. ज्यामुळे जमिनीमध्ये पाण्याची क्षमता वाढेल व गावसुद्धा डासमुक्त होईल. याकरिता घरोघरी व सार्वजनिक ठिकाणी सोकपीट लावण्यात आले. याची पहाणीसुद्धा परिणय फुके यांनी केली व या अभियानाची प्रसंशा केली. यावेळी आ. विजय रहांगडाले, जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, संघटन मंत्री बाळा अंजनकर, ग्राममंडळ अध्यक्ष अमोल नांदुरकर, संजय भांडारकर, संतोष शेंडे, जगन्नाथ भांडारकर, दयाराम नांदगाये, ग्राममंडळाचे सर्व पदाधिकारी, भाऊराव उके, पं.स. सदस्य भूपेश्वर रहांगडाले, खानसी रहांगडाले, उपविभागीय अधिकारी भंडारी, तहसीलदार रामटेके व कर्मचारीवर्ग व सोबतच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चावडी वाचन मोहिमेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा
By admin | Published: May 23, 2017 12:56 AM