लाेकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : धान केंद्र सुरू करण्याच्या मागणीसाठी बाराभाटी परिसरातील शेतकऱ्यांनी नवेगावबांधच्या उपप्रादेशिक कार्यालयासमोर धान आणून ठेवले व गुरुवारपासून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. दोन दिवसात धान खरेदी सुरू न झाल्यास कार्यालयासमोरील वडसा-कोहमारा रस्त्यावर धान ठेवून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. रब्बी हंगामातील धानपिकाची मळणी होऊन धान विक्रीसाठी तयार झाले आहे, तर काही शेतकऱ्यांची धान मळणी सुरू आहे. मात्र, अद्याप शासकीय आधारभूत हमी भाव खरेदी केंद्र सुरू झाले नाहीत. अवघ्या १५ दिवसांवर पावसाळा येऊन ठेपला आहे. अल्पावधीत धान विक्री करायचे की खरिपाची तयारी करायची असे संकट शेतकऱ्यांवर ओढवले आहे. पदरी पैसा नाही. कोरोनाचे संकट आहे. केंद्र सुरू न करता शासन एकप्रकारे खासगी व्यापाऱ्यांना मातीमोल भावात धान विकण्यासाठी बाध्य करीत आहे. शेतकऱ्यांच्या जीवन-मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, शासन व प्रशासन गांभीर्याने घेत नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. यासंदर्भात बाराभाटी येथील किशोर बेलखोडे व शेतकऱ्यांनी ११ मे रोजी प्रशासनाला लेखी पत्र देऊन दोन दिवसांची मुदत दिली होती. मात्र, उपप्रादेशिक कार्यालयाकडून धान खरेदी करण्यासाठीचे कुठलेही नियोजन व कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे गुरुवारी दुपारी १२ वाजता शेतकरी उपप्रादेशिक कार्यालयासमोर आले. संबंधित अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने त्यांनी कार्यालयासमोरील प्रांगणात धान ठेवून ठिय्या आंदोलन आरंभले. २३ मे पर्यंत धान खरेदी सुरू न झाल्यास २४ मे रोजी कार्यालयासमोरून जाणाऱ्या राज्य महामार्ग क्र ११ वर धान ठेवून रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
ठिय्या आंदोलन सुरूच ठेवणार धान खरेदी केंद्र सुरू होईपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच राहणार असल्याने प्रशासनासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. उपप्रादेशिक कार्यालयासमोर पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे. आंदोलन व अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलिसांनी दबावतंत्राचा वापर केला. मात्र, आंदोलनकर्ते शेतकरी आपल्या निर्णयावर ठाम होते. शेवटी त्यांनी ठिय्या आंदोलन आरंभले. या ठिय्या आंदोलनात भोजराज बेलखोडे, तेजराम डोंगरवार, भारत बेलखोडे, किशोर येरणे, सुखराम हातझाडे, आनंदराव डोंगरवार, बबरू भंडारी, शिशूपाल बेलखोडे, बाराभाटीचे सरपंच महादेव प्रधान, लैलेश शिवणकर, किशोर बेलखोडे यांचा समावेश आहे. जिथे गोदाम उपलब्ध तिथे खरेदी सुरू शासनाचे निर्देश आल्यानंतर शासनाच्या निर्देशाप्रमाणे खरेदी सुरू आहे. निर्देश प्राप्त होताच धान खरेदी केंद्र सुरू करू. धान खरेदीकरिता ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. जिथे गोदाम उपलब्ध आहेत तिथे खरेदी केंद्र सुरू करण्याच्या शासनाकडून सूचना येताच तसे धान खरेदी करणाऱ्या संस्थांना कळविण्यात येईल, असे गणेश सावळे, उपप्रादेशिक व्यवस्थापक नवेगावबांध यांनी सांगितले.