मुन्नाभाई नंदागवळी
बाराभाटी (गोंदिया) : परिश्रमाला जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाची जोड दिल्यास निश्चितच अपेक्षित फळ मिळते. परिस्थितीचा बाहू न करता, आहे त्या परिस्थितीशी दोन हात करून यश कसे पदरात पाडता येईल, हा विचार करणारेसुद्धा बरेच जण आहेत. आपण ठरविलेले ध्येय गाठायचेच हीच खूणगाठ बांधून परिश्रम घेणाऱ्या शेतमजुराच्या मुलाला अखेर यश आले असून, एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण करून पोलिस उपनिरीक्षक होत आई-वडिलांच्या कष्टाचे फलीत केले आहे.
गिरीश प्यारेलाल रंगारी (रा. बाराभाटी, येरंडी, ता. अर्जुनी मोरगाव) असे पोलिस उपनिरीक्षक झालेल्या शेतकऱ्याच्या मुलाचे नाव आहे. एमपीएससी परीक्षेचा निकाल चार दिवसांपूर्वीच जाहीर झाला. यात गिरीशने ही परीक्षा उत्तीर्ण केली असून, त्याची पोलिस उपनिरीक्षकपदासाठी निवड झाली आहे. गिरीश एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्याची वार्ता गावात पसरताच गावकरी आणि त्याच्या मित्रांनी त्याचे घर गाठून कौतुक केले.
गिरीशचे आई-वडील हे शेतकरी आहेत. थोडीफार शेती आणि मोलमजुरी करून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. गिरीशने सुरुवातीपासूनच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते. त्याचे दहावीपर्यंतचे शिक्षण बाराभाटी येथील पंचशील विद्यालयात झाले. १२वीपर्यंतचे शिक्षण मिलिंद कला विद्यालय छत्रपती संभाजीनगर येथे झाले. पदवीपर्यंतचे शिक्षण भंडारा येथील जे. एम. पटेल महाविद्यालयात झाले. त्याने सन २०१७पासून यूपीएससी व २०२१ पासून एमपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. या कालावधीत त्याने विविध परीक्षा दिल्या. काही परीक्षांचे निकाल अजून यायचे आहेत. तर सहायक कमांडर पदाची मुलाखत २५ जुलै रोजी आहे. मात्र, त्यापूर्वीच त्याचा एमपीएससी परीक्षेचा निकाल आला, त्याची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य, विचार, अभ्यासाच्या व्यासंगाची जाणीव ठेवून स्पर्धा परीक्षेची तयारी केली. यासाठी पीआयटीसी नागपूर या सामाजिक सेवाभावी संस्थेची सुद्धा खूप मदत झाल्याचे गिरीश रंगारीने सांगितले.
मित्रांच्या मार्गदर्शनाची झाली अभ्यासासाठी मदत
नुकताच यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेला गोंदिया येथील अमित उंदीरवाडे यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास कसा करायचा यासाठी दिलेल्या टिप्सची गिरीशला हे यश गाठताना खूप मदत झाली. गजू जिद्देवार, राहुल लांजेवार या मित्रांनी सुद्धा त्याला वेळाेवेळी मदत करीत त्याला प्रोत्साहान देण्याचे काम केल्याचे गिरीशने सांगितले.
अपयशाने खचू नका, अधिक परिश्रमाची तयारी ठेवा
अलीकडे शहरी भागासह ग्रामीण भागातील युवकांचा कल सुद्धा स्पर्धा परीक्षांकडे वाढत असून, यात त्यांना यश सुद्धा येत आहेे; पण काही युवक एक-दोन प्रयत्नात अपयश आल्यानंतर निराश होऊन दुसरा मार्ग निवडीत आहेत. मला सुद्धा आठ-दहा वेळा अपयश आले; पण मी खचलो नाही, माझ्याकडून नेमक्या काय चुका झाल्या, मी कुठे कमी पडलो, याचा शोध घेऊन व चुका सुधारून अधिक जोमाने अभ्यासाला लागलो त्याचीच पावती म्हणजे हे मिळालेले यश होय. त्यामुळे युवकांनो अपयशाने खचून जावू नका, अधिक परिश्रमाची तयारी ठेवा नक्कीच यश मिळेल.
- गिरीश रंगारी