सालेकसा : एकीकडे पेट्रोल-डिझेलची दरवाढ आणि गॅसच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य लोकांसह प्रत्येक गृहिणींचे घराचे बजेट बिघडले आहे. त्यात आता राज्य शासनाकडून वीज बिल व शेतीचा पानसारा वसूल करण्याची धडक मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी व सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाला असून, त्याचे जीवन जगणे कठीण होत चालले आहे.
लॉकडाऊन काळातील थकीत घरगुती वीज बिलाची रक्कम वसुलीची सक्ती वीज विभागाने सुरू केली. त्यामुळे गरीब शेतकरी व शेतमजूर वर्गाला वीज बिल भरणे फारच कठीण जात आहे. अशात अनेक ग्राहकांनी वीज बिल भरण्यास असमर्थता दाखविल्याने वीज वितरण कंपनीने वीज कनेक्शन कापणे सुरू केले आहे. त्यामुळे लोकांना अंधारात राहण्याची वेळ आली आहे. असे सुरू असतानाच शेतकरी वर्गाला शासनाच्यावतीने वसुलीचा धक्के पे धक्का दिला जात आहे. शेतीतील वीज पंपाची वीज बिल वसुलीसुद्धा सक्तीने केली जात आहे. अनेक शेतकऱ्यांवर १०-२० हजारांपासून एक लाखापर्यंत वीज बिल थकीत आहे. यात सर्वसामान्य अल्पभूधारक शेतकऱ्यांपासून मोठे शेतकरी सामील आहेत. यात काही मोठ्या राजकारणी शेतकऱ्यांनी लाखोंचे बिल थकीत करून ठेवले आहेत. ते वीज विभागाकडून वसुलीसाठी गेले असता आपल्या प्रभावाचा उपयोग करून वीज बिल भरण्यास टाळाटाळ करतात.
परंतु, गरीब छोट्या शेतकऱ्यांना वसुलीचे नोटीस दिले जात आहे. असे वसुली अभियान सुरू असतानाच आता पाटबंधारे विभागाने पानसारा वसुलीची मोहीम सुरू केली आहे. चारचाकी वाहनाने थेट शेतकऱ्यांच्या घरी जाऊन सक्तीने पानसारा मागीतला जात आहे. आजघडीला सर्वसामान्य लोकांकडे हाताला काम नाही. कसलेही उत्पन्नाचे साधन नाही. शेती तोट्याची ठरत आहे, वरून शासनाची वेगवेगळी वसुली दुसरीकडे पेट्रोल-डिझेलच्या भाववाढीमुळे वाहतूक खर्च वाढला असून, खाण्यापिण्याच्या वस्तूसुद्धा महागल्या आहे. यात रक्कम कोठून देणार, असा प्रश्न पडला असून शासनाच्या वसुलीच्या दडपणात शेतकरी फरफटत चालला आहे.