केशोरी : सन २०२०-२१ या वर्षाच्या खरीप हंगामातील धान खरेदी करण्यासाठी आदिवासी विकास महामंडळाने इळदा येथील विविध कार्यकारी संस्थेला आधारभूत धान खरेदी केंद्र सुरु करण्याची परवानगी दिली. या केंद्राअंतर्गत येणाऱ्या ग्राम परसटोला येथील शेतकऱ्यांचे धान खरेदी केले जात नसल्यामुळे येथील शेतकरी अत्यंत अडचणीत सापडले असून धान खरेदी केंद्र प्रमुखांच्या कार्यप्रणालीवर नाराजी व्यक्त करत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करुन धान खरेदी केंद्र सुरु करण्याची मागणी केली आहे.
अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील आधारभूत धान खरेदी केंद्र इळदा अंतर्गत येणाऱ्या ग्राम परसटोला येथील शेतकऱ्यांनी सन २०२०-२१ या वर्षातील खरीप हंगामातील धान ७-१२ नुसार नोंद करुन धान विक्री क्रमांक येण्याची वाट पाहत होते. परंतु केंद्रप्रमुखांनी परसटोला येथील कोणत्याही शेतकऱ्यांना धान मोजण्याकरीता बोलाविले नाही. उलट त्यांच्यानंतर येणाऱ्या स्थानिक शेतकऱ्यांना बोलावून त्यांचे धान खरेदी करण्याचा प्रकार केला आहे. या संबंधी परसटोला येथील काही शेतकरी केंद्रप्रमुखांना विचारणा करण्यासाठी गेले असता बारदाना उपलब्ध नसल्यामुळे जे शेतकरी बारदाना घेऊन येतात त्यांचे धान खरेदी करणे सुरु आहे असे सांगितले.
जेव्हा बारदाना घेऊन परसटोला येथील शेतकरी केंद्रावर गेले तेव्हा आजपर्यंत खरेदी करण्यात आलेल्या धान्याची उचल होत नाही तोपर्यंत आधारभूत धान खरेदी केद्र बंद असल्याचे सांगून शेतकऱ्यांना परत पाठविले. यामुळे केद्रप्रमुखांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. धान खरेदी करण्याचा मार्च हा महिना शेवटचा असतो. अजूनही परसटोला येथील शेतकऱ्यांचे धान त्यांच्याकडे पडून आहेत. त्यामुळे या वर्षातील खर्च कसा करावा असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. इळदा येथील आधारभूत केंद्राच्या केंद्रप्रमुखांची चौकशी करुन महामंडळाने परसटोला येथील शेतकऱ्यांवर होणारा अन्याय दूर करावा या मागणीसह परसटोला येथील शेतकरी तेजराम पुस्तोडे यांनी शेतकऱ्यांच्या स्वाक्षरीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांचेकडे सादर करुन इळदा येथील आधारभूत धान खरेदी सुरु करण्याची मागणी केली आहे.