नवेगावबांध : अर्जुनी मोर तालुक्यातील तालुका खरेदी-विक्री सेवा संस्था व आदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदी केंद्रावर रबी हंगामातील
धान खरेदी-विक्री अद्यापही सुरू झाली नाही. ३० एप्रिलपर्यंत आधारभूत धान खरेदी केंद्रावर धान विक्रीसाठी नोंदणी करावी अशी सूचना शेतकऱ्यांना देण्यात आली होती; परंतु आधारभूत धान खरेदी केंद्रांवर कुठल्याही प्रकारची अद्याप नोंदणी करण्यात आली नाही. त्यामुळे धान खरेदी केंद्र केव्हा सुरू होणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
तालुका खरेदी-विक्री सेवा संस्थेने व आदिवासी सहकारी संस्था यांच्यामार्फत शेतकऱ्यांना धान खरेदी केंद्रावर धानाची खरेदी सुरू करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. खरीप हंगामातील धान खरेदीमुळे तालुक्यातील गोदामे आधीच हाऊसफुल्ल आहेत. व्यापाऱ्यांनी धानाची भरडाईसाठी उचल केली नसल्यामुळे गोदामे हाऊसफुल्ल आहेत. धानाच्या भरडाईचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. आमदार मनोहर चंद्रिकापुरे व राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण सचिव विलास पाटील व संबंधित अधिकारी यांच्यात झालेल्या चर्चेनुसार ३१ मे अखेर किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात व्यापारी धान उचल करून, रबी हंगामातील धान खरेदी केंद्र सुरू होणार आहेत. पावसाळ्यात धान खरेदी जर सुरू झाली, तर शासनाच्या या ढिसाळ नियोजनाचा फटका शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. जोपर्यंत गोदामातील धान उचलत नाही तोपर्यंत गोदामे भरलेलीच राहणार. मग रबी हंगामातील धानाची खरेदी कशी करणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आधारभूत शासकीय धान खरेदी केंद्र लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
......
खरेदी केंद्राबाहेर धान पडून
शासकीय आधारभूत धान खरेदी-विक्री केंद्राबाहेर मागील १५ दिवसांपासून कित्येक शेतकऱ्यांचे धान येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उप यार्डात पडून आहेत. काही शेतकऱ्यांनी आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू होण्याची वाट पाहत धान घरीच ठेवले आहेत. उन्हाळ्याचा आता शेवटचा टप्पा असून, लवकरच येणाऱ्या मृग नक्षत्रात शेतकऱ्यांना खरीप हंगामाकरिता लागणारे साहित्य, बी-बियाणे, नांगरणी, रोवणी खर्च कसा करायचा? हा प्रश्न हवालदिल असलेल्या शेतकऱ्यांपुढे उभा आहे. नवेगावबांध येथील कृषी उत्पन्न बाजार उपसमितीतील शासकीय आधारभूत केंद्रांवर शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणून ठेवलेले धानाचे पोते.
......