केशोरी : अलीकडे महावितरण कंपनीच्या भरमसाट दरवाढीमुळे शेतकऱ्यांना शेतीच्या भरवशावर वीजबिल भरणे परवडणारे नाही. यामुळे या परिसरातील शेतकरी सौरपंप संयंत्राकडे वळत आहेत.
सुरक्षाकवचाविना डीपी धोकादायक
सालेकसा : अनेक ठिकाणी वीज कंपनीच्या डीपी खुल्या अवस्थेत आहेत. या उघड्या डीपींमधूनच वीजपुरवठा होत आहे. त्यामुळे मोठ्या धोक्याची शक्यता नाकारता येत नाही.
नाल्यांअभावी सांडपाणी रस्त्यावर
गोंदिया : ग्रामीण भागात सिमेंटचे रस्ते करण्यात आले. मात्र, पुरेशा नाल्या खोदल्या नाहीत. ज्या ठिकाणी नाल्या खोदल्या तेथील नाल्याही नागरिकांनी बुजवून टाकल्या आहेत.
महिलांना जनधनच्या मानधनाची प्रतीक्षा
गोरेगाव : गरीब महिलांना आर्थिक बळ म्हणून केंद्र शासनाने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत महिलांच्या जनधन बचत खात्यात अनुदान जमा केले होते. मात्र आता अनुदान जमा झालेले नाही.
ग्रामीण भागात माकडांचा आतंक
पांढरी : सध्या सगळीकडे शेतीची कामे सुरू आहेत. शेतात नागरिकांची उपस्थिती असल्यामुळे माकडांनी गावाकडे धाव घेतली आहे. माकडे गावात येऊन घराचे व भाजीपाल्याचे नुकसान करीत आहेत.
वृक्षतोडीकडे वनविभागाचे दुर्लक्ष
सडक-अर्जुनी : वनसंपदेने नटलेल्या गोंदिया जिल्ह्यातील वनांमध्ये मोठ्या प्रमाणात वनतस्कर व शिकाऱ्यांची वहिवाट असल्याचे दिसून येते. वनविभागाचे वनांकडे दुर्लक्ष असल्याची वनतस्करांनी संधी साधून जंगलातील वनसंपदा तोडण्याचा सपाटा सुरू केला आहे. शिकाऱ्यांमुळे वन्यप्राण्यांचेही जीव धोक्यात आले आहेत. वनविभागाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
रेल्वे चौकीला उड्डाणपुलाची प्रतीक्षा
आमगाव : गोंदिया-आमगाव राज्यमार्गावर किडंगीपार येथील मुंबई-हावडा मार्गावर असलेली रेल्वे चौकी मालवाहतूक व प्रवासी वाहनांसाठी फार मोठी डोकेदुखी ठरत आहे. या मार्गावरील रेल्वे चौकीवर उड्डाणपुलाची मागणी प्रलंबित आहे. जनप्रतिनिधी नेहमी याकडे दुर्लक्ष करीत आहेत.
डिझेलच्या दरवाढीने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर
केशोरी : केंद्र सरकारने डिझेलचे भाव वाढविल्यामुळे सर्व क्षेत्रांसह शेतीवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे. विदर्भातील गोंदिया, भंडारा या दोन जिल्ह्यांमध्ये धान पिकासह इतरही पिकांचे उत्पन्न घेण्यासाठी वर्षभर शेतकरी ट्रॅक्टरच्या साहाय्याने शेतीची मशागत करतात. शेतीच्या मशागतीसाठी वापरात येणारे महत्त्वाचे साधन म्हणजे ट्रॅक्टर होय. पण आता महागाईमुळे ट्रॅक्टरद्वारे मशागत करणे कठीण झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
प्रवासी निवाऱ्याची मागणी
मुंडीकोटा : तिरोडा तालुक्यातील नवेझरी या गावी प्रवासी निवारागृह होते; पण जीर्ण होऊन जमीनदोस्त झाले आहे. या ठिकाणी प्रवासी निवारागृह असणे फार गरजेचे आहेे.
कामगारांची योजना पूर्ववत सुरू करा
नवेगावबांध : कामगार कल्याणकारी मंडळ अंतर्गत इमारत बांधकाम करणाऱ्या गरीब मजुरांना थेट पाच हजार रुपये देण्याची योजना पूर्ववत करण्याची मागणी खराशी व परिसरातील बांधकाम कामगारांनी केली आहे. कोरोना पार्श्वभूमीवर लॉकडाऊन कालावधीत इमारत व इतर बांधकामे बंद झाली होती. परिणामी बांधकाम कामगारांना रोजगार मिळेनासा झाला.
शिपाई पदभरतीची वयोमर्यादा वाढवा
आमगाव : मागील २-३ वर्षांपासून पोलीस शिपाई भरतीप्रक्रिया झालेली नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील लाखो तरुण बेरोजगार असून, ते पोलीस भरतीच्या प्रतीक्षेत आहेत. महाराष्ट्राच्या बेरोजगार युवकांच्या दृष्टिकोनातून पोलीस भरतीसाठी वयोमर्यादा ३३ वरून ३५ वर्षं करण्यात यावी, अशी मागणी बेरोजगार तरुणांनी केली आहे.