तालुक्यात भरीव कामे : पाऊस आल्यानंतर भरणार नाले, बंधारेअर्जुनी-मोरगाव : गावात सिंचन व पिण्याच्या पाण्याचे जलस्त्रोत वाढविण्याच्या दृष्टीने शासनाची जलयुक्त शिवार ही योजना शेतकरी व गावकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे. तालुक्यात याअंतर्गत चांगली कामे झाली आहेत. या योजनेंतर्गत २०१६-१७ या वर्षात कृषी विभागातर्फे बोळदे, करडगाव, भिवखिडकी, परसोडी, येरंडी देवी, डोंगरगाव, सावरटोला, पिंपळगाव व गुढरी येथे कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. ही कामे १ एप्रिल ते १६ जून २०१७ पर्यंत पूर्ण करावयाची आहेत. २०१५-१६ या वर्षात कृषी विभागातर्फे नवनीतपुर, बोळदे/कवडा, कुंभीटोला व परसटोला या चार गावातील कामे हाती घेण्यात आली होती. ही कामे ३० जूनपर्यंत पूर्णत्वास येत आहेत. गावात जलस्त्रोत वाढविण्याच्या दृष्टीने जुन्या नाल्यांचे खोलीकरण, जुने बंधारा दुरुस्ती, भातखाचर, शेततळे, मामा तलावा दुरूस्ती, वनतळे, सिमेंट बंधारे ही कामे या योजनेच्या माध्यमातून केली जात आहेत. १० टक्के मनुष्यबळ व ९० टक्के यांत्रिकी पध्दतीने प्रस्तावित कामे पूर्ण होतील. कोरडवाहू जमिनीत संरक्षित ओलीताच्या दृष्टीने नाला खोलीकरणाची कामे प्रस्तावित झाली आहेत. एक ते दिड मीटर खोलीकरण झाल्याचे पाणी साठा साधारणत: डिसेंबर महिन्यापर्यंत उपलब्ध राहील. एरवी हा साठा आॅक्टोबरपर्यंत राहतो. उशीरापर्यंत पाऊस झाल्यास शेतकऱ्यांना रब्बी हंगामाच्या सिंचनासाठी वाढीव जलसाठ्याचा लाभ होणार आहे. खोलीकरणामुळे अतिवृष्टी झाली तरी शेतात पाणी साचणार नाही. योग्य वाटेने साचलेले पाणी नाल्यात जाईल. या प्रकारामुळे शेतमालाची नासाडी होण्याची शक्यता राहत नाही. पाण्याचे दुर्भिक्ष्य असलेल्या व कोरडवाहू गावात अशी कामे मोठ्या प्रमाणावर होत असल्याने ग्रामीण भागात आनंद व्यक्त केला जातो तर ९० टक्के यांत्रिकीपध्दतीने कामे होत असल्याने रोजगार उपलब्ध होत नाही म्हणून नाराजीचा सूरसुध्दा असतो. गतवर्षी झालेल्या चार कामांवर सुमारे २ कोटी रुपये खर्च झाले. अशी कामे पूर्ण झाल्यानंतर शासनाची परत विस्तारीत योजना आहे. याच ठिकाणी तीन मीटर खोल खड्या (डोह) तयार करून बारमाही पाणी उपलब्ध राहण्याची योजना आहे. वनविभागाने वनतलावात या पध्दतीची कामे सुरू केली आहेत. ही सर्व कामे विभागांतर्गत होत असली तरी या कामांवर देखरेखीसाठी एनजीओ नेमणे आहेत. ते या कामांना भेटी देवून चित्रीकरण करतात व तसा अहवाल शासनाला सादर करीत असल्यामुळे पारदर्शकता आली आहे. शेतकऱ्यांना तलाव, बोडीतील गाळ हवा असल्यास त्यांना केवळ वाहतुकीचा खर्च आकारणी करून गाळ उपलब्ध करून दिला जातो. तलाव अथवा बोडीतील गाळ हा शेतजमिनीच्या सुपीकतेसाठी अधिक लाभदायक असतो. एकंदरीत जलयुक्त शिवार ही योजना कोरडवाहू शेतजमिनीच्या मालकांसाठी नवसंजीवनी ठरणार आहे. (तालुका प्रतिनिधी)कडधान्याचे पिक वाढणारवाढीव जलस्त्रोतांचा कडधान्याचे पीक घेण्यासाठी अधिक लाभ होणार आहे. ग्रामीणांना यांत्रिकी पध्दतीने होणाऱ्या कामात स्वारस्य नसते, मात्र तीच कामे मग्रारोहयोजनेतून केल्यास त्यांना अर्थप्राप्ती होते. पण यांत्रिकी पध्दतीपेक्षा शासनाला चारपटीने खर्च अधिक येतो. तरी सुध्दा काही यंत्रणा ही कामे मग्रारोहयोजनेतून करतात. असा प्रकार करडगाव/बोळदे येथे अनुभवास आला. ज्या भागात तलाव व नाले दुरूस्तीची कामे केली जातात. जलस्त्रोत वाढीमुळे नाल्यापासून १ किमी परिसरातील बोअरवेल्स व विहीरींच्या पाणीसाठ्यात वाढ होते.
जलयुक्त शिवार ठरणार शेतकऱ्यांना वरदान!
By admin | Published: July 01, 2016 1:47 AM