गोंदिया : जिल्ह्यात मागील तीन-चार दिवसांपासून सातत्याने अवकाळी पाऊस हजेरी लावत असल्याने रब्बी हंगामातील पिकांवर संकट ओढावले आहे. मंगळवारी सकाळच्या सुमारास जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांसह भाजीपाला पिकाचेसुध्दा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
हवामान विभागाने जिल्ह्यात २१ मार्चपर्यंत अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा दिला होता. शुक्रवार ते रविवारदरम्यान अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर मंगळवारी (दि.२३) पहाटेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. त्यामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा व मका या पिकांना फटका बसला. पावसाचा सर्वाधिक फटका भाजीपाला पिकांना बसला. जिल्ह्यातील शेतकरी बऱ्याच प्रमाणात शेतीला जोडधंदा म्हणून भाजीपाल्याची लागवड करतात. मात्र पावसाने भाजीपाला उत्पादकांच्या आशेवर पाणी फेरले, तर शासकीय धान खरेदी केंद्रांवर खरेदी केलेला २९ लाख क्विंटल धानसुध्दा उघड्यावर पडला असून या धानालासुध्दा काही प्रमाणात अवकाळी पावसाचा फटका बसल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, पुन्हा पाऊस झाल्यास पिकांचे नुकसान वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.