कपिल केकत
गोंदिया : सध्या नवरात्र सुरू असून बहुतांश नागरिकांचे उपवास असतात. अशात जेवण सोडून उपवासाचे पदार्थ खाल्ले जात असल्याने खाण्यापिण्यावरील खर्च वाचणार असे वाटत होते. मात्र परिस्थिती विपरित असून उपवासांचा फायदा व्यापारी घेत असून उपवासाच्या पदार्थांचे भाव वाढविण्यात आल्याचे दिसत आहे. यामुळे आता उपवासही महागडा झाला असून सर्वसामान्यांना परवडणारा राहिलेला नाही.
नवरात्रीत अनेकांचा नऊ दिवसांचा उपवास असतो. अशात उपवासाचे विविध पदार्थ, फळांचा आहार केला जातो. परंतु, त्यांची मागणी वाढल्यामुळे व्यापाऱ्यांनीही भाव वाढविले आहे. शिवाय आता दिवाळी तोंडावर असून उपवासात लागणाऱ्या वस्तू दिवाळीच्या फराळासाठीही लागतातच. अशात या वस्तूंना आता मागणी राहणारच असल्याने व्यापारी त्याचा फायदा घेत आहेत.
उपवासात जेवणाचा खर्च वाचणार असे साधारणपणे बोलले जाते. मात्र वाढलेल्या महागाईमुळे आता उपवासही परवडणारे राहिलेले नाही. उपवासाचे पदार्थ बनविण्यासाठी लागणाऱ्या सर्वच वस्तू महागल्या आहेत. शिवाय फळांचे दरही वधारलेले असल्याने उपवासातही काय खावे असा प्रश्न पडतो.
भावफलक असा...
घटक- पूर्वीचे भाव- सध्याचे भाव
शेंगदाणे- १५०-१६०
भगर-११०-१२०
बटाटे-२०-२५
साबुदाणा-८०-१००
रताळी-६०-८०
ना फळे परवडतात, ना भगर साबुदाणा!
महागाईमुळे सर्वसामान्यांना काय खावे असा प्रश्न दररोज पडतो. आता नवरात्रीचे उपवास सुरू असून महागाईमुळे उपवासही महागले आहेत. यात उपवासाचे पदार्थ बनविण्यासाठी लागणाऱ्या वस्तूंचे दर वधारले असतानाच फळेही १०० रुपयांच्या वरच आहेत. यामुळे उपवासाचे पदार्थ परवडणारे नसतानाच पळेही आवाक्याबाहेरची आहेत.