खातिया (गोंदिया) : माझ्या मुलाचा अपघात नसून त्याला मारण्यात आले, असा आरोप करीत या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषीवर कारवाई करण्यात यावी. या मागणीला घेऊन वडिलाने मोबाईल टॉवरवर चढून वीरूगिरी केली. ही घटना गुरुवारी (दि.१४) सकाळच्या सुमारास गोंदिया तालुक्यातील खातिया येथे घडली. ही घटना उघडकीस आल्यानंतर टॉवरवर चढलेल्या व्यक्तीला खाली उतरविण्यासाठी प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली होती.
वासुदेव रामु तावाडे (रा. खातिया) असे मोबाईल टॉवरवर चढून वीरूगिरी करणाऱ्या वडिलांचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार: वासुदेव तावाडे हे गुरुवारी सकाळीच कुटुंबीयांना काहीही न सांगता बाहेर निघून गेले. दरम्यान, सकाळी ७ वाजताच्या सुमारास गावातील मोबाईल टॉवरवर एक व्यक्ती बसला असल्याचे गावकऱ्यांना दिसला. याची वार्ता गावात पसरताच गावकऱ्यांनी टॉवरजवळ गर्दी केली. दरम्यान, गावकऱ्यांनी या घटनेची माहिती रावणवाडी पोलिसांना दिली. यानंतर काही वेळातच रावणवाडी पोलीस स्टेशनचे ठाणेदार उद्धव घबाळे हे पोलीस ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले.
वासुदेव तावडे यांच्याजवळ असलेल्या मोबाईलवर फोन लावून त्यांच्या कुटुंबीयांनी आणि पोलिसांनी त्यांच्याशी संवाद साधून टॉवरवरून खाली उतरण्याची विनंती केली. मात्र, ते कुणाचेही ऐकण्यास तयार नव्हते. सायंकाळी ५ वाजतापर्यंत ते टॉवरवरच बसून होते. पोलीस उपअधीक्षक एम. बी. ताजने यांनी घटनास्थळी पोहोचत वासुदेव यांना खाली उतरण्याची विनंती केली, मात्र ते कुणाचेही ऐकण्यास तयार नव्हते. त्यामुळे सायंकाळी उशिरापर्यंत त्यांचे वीरूगिरी आंदोलन सुरूच होते. त्यांच्या या आंदोलनाने पोलीस आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती.
काय आहे नेमके प्रकरण?
वासुदेव तावाडे यांच्या मुलाचा काही दिवसांपूर्वी अपघातात मृत्यू झाला. मात्र, माझ्या मुलाचा अपघात नसून त्याला मारण्यात आल्याचा आरोप तावाडे यांनी केला. मात्र, पोलीस विभागाने याप्रकरणाची योग्य चौकशी केली नसल्याचा आरोप केला. तसेच, याप्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. याच मागणीला घेऊन गुरुवारी त्यांनी मोबाईल टॉवर चढून वीरूगिरी आंदोलन केल्याची माहिती आहे.
कर्जाची उचलच केली नाही
वासुदेव तावाडे यांच्या नावावर विविध सेवा सहकारी सोसायटीचे १ लाख १४ हजार रुपयांचे कर्ज आहे. मात्र, वासुदेव तावाडे व त्यांच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार त्यांनी कुठल्याच कर्जाची उचल केलेली नाही. मग हे कर्ज त्यांच्यावर नावावर कसे चढविण्यात आले, असा सवाल त्यांनी केला. तसेच या मुद्दाला घेऊन सुद्धा त्यांनी वीरूगिरी आंदोलन केले. दरम्यान, विविध सेवा सहकारी सोसायटीचे सचिव हत्तीमारे यांनी घटनास्थळी येऊन तावाडे यांचे काही कर्ज माफ झाले, व्याजासह १ लाख १४ हजार ७९४ रुपयांचे कर्ज शिल्लक असल्याचे सांगितले.
समस्या मार्गी लावू खाली उतरा
गोंदियाचे नायब तहसीलदार पालांदूरकर यांनी घटनास्थळी पोहोचून व सबंधित अधिकाऱ्यांना बोलावून वासुदेव तावाडे यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधून त्यांच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. तसेच त्यांना टॉवरवरून खाली उतरण्याची विनंती केली. मात्र, तावाडे यांनी जोपर्यंत जिल्हाधिकारी आणि आमदार घटनास्थळी येऊन याबाबत लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत खाली उतरणार नाही, अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे त्यांचे वीरूगिरी आंदोलन सुरूच होते.
१२ तास चालले आंदोलन
वासुदेव तावाडे यांनी मुलाच्या मृत्यूची चौकशी आणि कर्जाची उचल न करता त्यांच्या नावावर दाखविलेल्या कर्जाच्या प्रश्नाला घेऊन सकाळी ७ वाजतापूर्वीच मोबाईल टॉवरवर चढले. सायंकाळी ६ वाजतापर्यंत त्यांचे आंदोलन सुरूच होते. जवळपास १२ तास हे आंदोलन सुरूच होते, त्यामुळे प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली होती.