लोकमत न्यूज नेटवर्क सडक-अर्जुनी : वनविकास महामंडळाच्या दुर्लक्षीतपणामुळे तालुक्यातील घनदाट जंगले आता आगीच्या विळख्यात सापडले आहेत. डोंगरगाव/डेपो येथील वनविकास महामंडळाचे (एफडीसीएम) पुतळी गावाजवळील कम्पार्टमेंट क्रमांक ५४१ मधील सुमारे पाच हेक्टर क्षेत्र जंगल जळून खाक झाले आहे. शनिवारी (दि.६) सायंकाळी ८ वाजतादरम्यान ही आग लागली असावी आता अंदाज आहे. या आगीत मौल्यवान औषधी वनस्पती व लहान रोपटी जळून खाक झालीत. तर या जंगलात वादळीवाऱ्यामुळे काही झाडे कोसळून पडली. काही वाळलेली झाडे सुध्दा या आगीत आजही धगधगत असल्याचे चित्र दिसत आहे. एफडीसीएमचे कर्मचारी रात्रीची गस्त करतात की नाही हा सुद्धा संशोधनाचा विषय आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीला सहाकेपार गावाजवळील जंगलात आग लागली होती. या सहाकेपार गावाजवळून दोन किमी. अंतरावर वन अधिकाऱ्यांचे कार्यालय आहे. पण त्यांना सुध्दा या आगीची भनक नव्हती. खरच एफडीसीएमचे अधिकारी कर्मचारी जागरूक असतील का? अशी चर्चा तालुक्यात होत आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे हे जंगल जळत आहे. त्यांच्यावर काय कारवाही होते याकडे लक्ष लागले आहे. पुतळी गावाजवळील कम्पार्टंमेंट क्रमांक ५४१ मध्ये आग लागल्याची माहिती मिळताच रात्री ११ वाजता आग विझविण्यात आली. आग कुणी लावली हे सांगता येत नाही. -अनंत गभणे वनक्षेत्र सहायक, डोंगरगाव डेपो
एफडीसीएमचे जंगल आगीत भस्मसात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2017 12:53 AM