ग्रामस्थांना दिलासा : गस्तीसाठी पोलीस विभागाने केले युवकांना तयार लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : मंत्री म्हटले की, कुठल्यातरी कार्यक्रमाच्या उद्घाटनाला, भूमिपूजनाला येणारे महत्त्वाचे व्यक्ती. परंतु जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून राजकुमार बडोले यांनी चोरांच्या भीतीने भयभीत असलेल्या सडक-अर्जुनी तालुक्यातील पिपरी, मनेरी, कोहमारा, कोदामेडी व कन्हेरी-राम या गावातील ग्रामस्थांना रात्री ११.३० वाजता पोलिसांसोबत रात्रीची गस्त घालून दिलासा दिला. सर्वसामान्यांना आपलेसे वाटणारे व त्यांच्याशी सहज संवाद साधता येईल असे पालकमंत्री म्हणून जिल्ह्याचे भूमिपूत्र असलेले राजकुमार बडोले यांनी स्वत: रात्री गावागावात भेटी दिल्या आहेत. जिल्ह्यातील विविध लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ मिळावा व जिल्ह्याचा विकास व्हावा, यासाठी त्यांची प्रामाणिक धडपड. आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक नागरिक सुरक्षित असला पाहिजे व चोरांच्या भीतीमुळे भयभीत झालेल्या ग्रामस्थांना रात्रगस्तीच्या भेटीतून दिलासा देण्याचे कामही त्यांनी नुकतेच केले. सडक-अर्जुनी तालुक्यातील अनेक गावांमध्ये चोर येण्याच्या अफवेने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले होते. अशा गावात पोलीस विभागाने सभा घेवून गावातील १० ते १५ युवकांना रात्रगस्तीसाठी तयार करु न त्यांना शिट्ट्या दिल्या. त्यामुळे भयभीत झालेल्या ग्रामस्थांना रात्रीला सुखाने झोपता येईल, यासाठी ही उपाययोजना केली. पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी या गावांना भेटी देवून ग्रामस्थांशी संवाद साधला. चोरांची ही केवळ अफवा असून घाबरु न जावू नका, असे त्यांनी सांगितले. गावात कोणतीही अनोळखी व्यक्ती आल्यास त्याला मारहाण न करता व कायदा व सुव्यवस्था हातात न घेता त्याची विचारपूस करु न पोलिसांच्या सुपूर्द करावे. कुठल्याही अनोळखी व्यक्तीला मारहाण करु न त्याच्या जीवाशी खेळू नये, असे त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधताना सांगितले. पालकमंत्र्यांनी रात्रगस्त घालून ग्रामस्थांना दिलासा दिला. यावेळी त्यांच्या समवेत पं.स. सभापती कविता रंगारी, पं.स. सदस्य राजेश कठाणे, डुग्गीपारचे ठाणेदार केशव वाभळे उपस्थित होते.
चोरांची भीती अन् पालकमंत्र्यांची रात्रगस्त
By admin | Published: June 03, 2017 12:11 AM