कपिल केकत।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कचऱ्याचे ओला व सुका असे वर्गीकरण करून टाकण्यात यावे यासाठी नगर परिषदेने शहरात ‘फायबर कंटेनर’ लावले. ओला व सुका कचरा टाकण्यासाठी हिरवा व निळा अशा दोन रंगांत लावण्यात आलेले हे कंटनेरच मात्र कचऱ्यात टाकण्यात आल्याचे बघावयास मिळत आहे. यातून नगर परिषदेचा प्रयोग तर फसला आहेच, मात्र यावर पैशांचा नासाडा झाल्याचेही बोलले जात आहे.शहरात निघणारा कचरा एकत्र टाकण्यात आल्याने त्याची उचल करताना सफाई कर्मचाºयांनाही त्रास होतो. यामुळे कचºयाचे ओला-सुका असे वर्गीकरण करून त्यांना वेगवेगळा टाकण्यात यावा यासाठी नगर परिषदेने शहरात ‘फायबर कंटेनर’चा प्रयोग केला. यांतर्गत ओला कचरा टाकण्यासाठी ‘हिरवा’ तर सुका कचरा टाकण्यासाठी ‘निळा’ अशा दोन रंगांचे ‘फायबर कंटेनर’ लावण्यात आले. एका लोखंडी साच्यात बसवून हे दोन कंटेनर लावण्यात आले होते. मात्र आज हे कंटेनरच कचºयात पडून असल्याचे बघावयास मिळत आहे.शहरवासीयांच्या सोयीसाठी नगर परिषदेने प्राथमिकस्तरावर हा प्रयोग केला होता. मात्र शहरातील कित्येक भागांत हा प्रयोग फसल्याचे दिसून येत आहे. कित्येक ठिकाणी लोकांनी कंटेनरचा लोखंडी साचाच लंपास केल्याचे दिसत आहे. तर काही ठिकाणी कंटेनरसह कचरा जाळून टाकल्याचेही ऐकीवात आहे. यातून मात्र नगर परिषदेने ज्या उद्देशातून हे कंटेनर लावले त्याची पुर्तता होत नसल्याचे स्पष्ट होत आहे. ओला-सुका कचरा वर्गीकृत केल्यास त्याची उचल करणे सोपे होते. परिणामी शहर स्वच्छ ठेवण्यास अधीक गती येणार हा नगर परिषदेचा उद्देश होता. मात्र शहरवासीयांनी या प्रयोगालाच माती चारली.लावण्यात आलेल्या या कंटेनरची कित्येक ठिकाणी दुरूस्तीही करण्यात आली. मात्र वारंवार तोच प्रकार घडत असल्यामुळे किती वेळा याकडे लक्ष द्यायचे असा प्रश्न संबंधीतांना पडत आहे. त्यात काही कंटेनरचे लोखंडी साचे लंपास करण्यात आल्याने कंटेनर बसवावे तरी कसे हा प्रश्न पडतो. तर फायबरचे असलेले हे कंटेनर वजनात हलके असल्याने चोरीला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.सुमारे १४ हजारांचे एक जोडस्वच्छता अभियानांतर्गत समिती शहराचे मुल्यांकन करण्यासाठी आली होती तेव्हा नगर परिषदेने हे कंटेनर शहरातील व्यापारी भागात लावले होते. यांतर्गत बाजार भागात २८ कंटेनर प्रायोगीक तत्वावर लावण्यात आले होते. सुमारे १४ हजार रूपयांचे एक जोड असल्याची माहिती असून यावर चार लाखांच्यावर खर्च करण्यात आले. हे कंटेनर लावल्यानंतर लगेच काही भागांत त्यांची तोडफोड करण्यात आली होती. त्यानंतर आता काही कंटेनर गायब झाले असून, काहींचे लोखंडी साचे लंपास करण्यात आले आहे. तर कित्येक ठिकाणी हे कंटेनर खुद्द कचºयात पडून आहेत. एकंदर नगर परिषदेचे चार लाख रूपये पाण्यात गेले असेच म्हणावे लागेल.शहरवासीयांच्या सहकार्याची गरजनगर परिषदेने एका चांगल्या उद्देशातून हे कं टेनर शहरात लावले होते. प्रायोगीक तत्वावर जरी फक्त २८ कंटेनर लावले गेले. तरी याला चांगला प्रतिसाद मिळाल्यास शहरात प्रभागनिहाय हा प्रयोग केला गेला असता. मात्र नागरिकांनी लावण्यात आलेल्या कंटेनरची चक्क ऐशीतेशी करून या प्रयोगालाच फेल केले. यात नगर परिषदेच्या पैशांचा नासाडा झाला असला तरिही तो पैसा शेवटी लोकांचाच आहे. यामुळे शहरवासीयांच्या सहकार्याचीही तेवढीच गरज आहे.
‘फायबर कंटेनर’ टाकले कचऱ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2018 9:10 PM
कचऱ्याचे ओला व सुका असे वर्गीकरण करून टाकण्यात यावे यासाठी नगर परिषदेने शहरात ‘फायबर कंटेनर’ लावले. ओला व सुका कचरा टाकण्यासाठी हिरवा व निळा अशा दोन रंगांत लावण्यात आलेले हे कंटनेरच मात्र कचऱ्यात टाकण्यात आल्याचे बघावयास मिळत आहे.
ठळक मुद्देनगर परिषदेचा प्रयोग फसला : पैशांची होताहे नासाडी