काचेवानी : रिमझिम पाऊस येत असल्याने घाणीच्या प्रमाणात खूप वाढ होते. त्यातून विविध प्रकारचे जंतू, किडे वगैरे मोठ्या प्रमाणात दिसून येतात. काही जंतू असे आहेत की, ते सहज डोळ्यांनी दिसत नाहीत. पाऊस आला की नागरिकांनी तसेच परिसरातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टरांनी सावधान राहणे गरजेचे आहे. तिरोडा तालुक्याच्या एकट्या करटी गावात २५ ते ३० पीलियाचे रुग्ण दिसून आल्याची माहिती आहे. पीलिया हा रोग अतिशय गंभीर स्वरूपाचा असून संसर्गजन्य असल्याची माहिती नागरिकांना दिली आहे. या आजारावर त्वरीत व सावधानपूर्वक उपचार करण्यात आले नाही तर रोगी दगावण्याची भीती असते. करटी (बु.) या गावात पीलियाचे २५ ते ३० रुग्ण आढळल्याची माहिती आहे. इंदोरा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टरांनी भेटी देवून तपासणी कार्य सुरू केल्याचे सांगण्यात आले. करटी (बु.) व्यतिरिक्त परिसरातील अन्य गावात संशयीत रुग्णांची माहिती काढून रक्ताचे नमुने तपासणीसाठी तातडीने पाठवावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. मागील वर्षी ऐन पावसाळ्याच्या वेळी बेरडीपार, जमुनिया, करटी आणि चिरेखनीसह अनेक गावात डेंगू, मलेरिया, हागवण (गॅस्ट्रो) चे प्रमाण वाढले होते. पाऊस सुरू होताच आरोग्य विभागाने परिसरातील उपकेंद्रात कार्यरत कर्मचाऱ्यांना सजगतेचा इशारा देऊन भेटी वाढविण्याचे आदेश द्यावे आणि उपचारासाठी औषधीचा साठा उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. तिरोडा तालुक्याच्या आरोग्य विभागाने सबंधित प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांतर्गत प्रत्येक गावात आरोग्य पथक पाठवून नियत्रंनात्मक उपाययोजना आखण्यात यावी आणि करडी नजर ठेवावी, अशी ताकीद आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. सद्यस्थितीत तापाचे (ज्वर) प्रमाण वाढल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे त्यांच्या रक्ताचे नमुने घेवून तपासणीसाठी पाठविण्यात यावे, अशीही मागणी नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)
करटी क्षेत्रात काविळाचे थैमान
By admin | Published: July 23, 2014 12:04 AM