गोंदिया : मागील पंधरा दिवसांपासून पावसाने जिल्ह्यात दमदार हजेरी लावली नव्हती. त्यामुळे पऱ्हे वाळण्याच्या मार्गावर होते तर रोवण्या खोळंबल्या होत्या. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट गडद झाले होते. मात्र गुरुवारी (दि. ८) सकाळी ७ वाजल्यापासूनच पावसाने जिल्ह्यात सर्वत्र दमदार हजेरी लावली. जवळपास तीन तास झालेल्या पावसामुळे शेतातील बांध्या आणि रस्त्यांवरसुध्दा मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. पावसामुळे पऱ्ह्यांना संजीवनी मिळाली असून रोवणीच्या कामालासुद्धा वेग येणार आहे. जिल्ह्यात तब्बल पंधरा दिवसांनंतर पाऊस अनलॉक झाल्याने बळीराजा सुखावला.
हवामान विभागाने यंदा शंभर टक्के पावसाचा अंदाज वर्तविला आहे. मात्र जून महिन्यापासूनच पावसाने दगा देण्यास सुरुवात केली. पावसाची दोन मोठी नक्षत्रे कोरडी गेल्याने शेतकऱ्यांच्या काळजीत भर पडली होती. जिल्ह्यात सर्वाधिक धानाचे क्षेत्र असून यंदा खरीप हंगामात एकूण १ लाख ८१ हजार हेक्टरवर धानाच्या लागवडीचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. जिल्ह्यात सरासरी १३२० मिमी पाऊस पडतो. १ ते ३० जून दरम्यान २०८ मिमी पावसाची नोंद झाली होती. जूनमध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली असली तरी पाऊस सलग लागून न पडल्यामुळे पेरणी व रोवणीची कामे खोळंबली होती. १५ दिवसांपासून पाऊस गायब झाल्याने दुबार पेरणीचे संकट अधिक गडद होत होते. मात्र गुरुवारी जिल्ह्यात सर्वत्र दमदार पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांवरील हे संकट टळले आहे. पऱ्ह्यांना संजीवनी मिळाली असून रोवणीच्या कामालासुद्धा शुक्रवारपासून वेग येण्याची शक्यता आहे. पावसामुळे बळीराजा सुखावल्याचे चित्र आहे.
.............
उकाड्यापासून दिलासा
मागील पंधरा दिवसांपासून पाऊस गायब झाल्याने गेल्या आठ दिवसांपासून प्रचंड उकाडा वाढला होता. त्यामुळे उकाड्याने जिल्हावासीय त्रस्त झाले होते. यामुळे विविध आजारांची लागण होण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र गुरुवारी झालेल्या पावसामुळे सर्वांनाच उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.
............
मजुरांची वाढली मागणी
तब्बल पंधरा दिवसांनंतर गुरुवारी पावसाने सर्वत्र दमदार हजेरी लावली. त्यामुळे रोवणीच्या कामाला एकाच वेळी सुरुवात होणार आहे. त्यामुळे रोवणी आणि पऱ्हे खोदण्याच्या कामासाठी मजुरांची मागणी वाढण्याची शक्यता आहे. गुरुवारच्या पावसानंतर अनेक शेतकऱ्यांनी शुक्रवारपासून रोवणीच्या कामाला सुरुवात करण्याचे नियोजन केले आहे.
................
तालुकानिहाय आतापर्यंत झालेला पाऊस व त्याची टक्केवारी
तालुका प्रत्यक्षात पडलेला पाऊस टक्केवारी
गोंदिया २६९.८ मिमी २२.३ टक्के
आमगाव १७१.६ मिमी १२ टक्के
तिरोडा २८०.६ मिमी २४.४ टक्के
गोरेगाव २१५.१ मिमी २१ टक्के
सालेकसा १७०.१ मिमी १४.७ टक्के
देवरी २८३.७ मिमी २२ टक्के
अर्जुनी मोरगाव ४२३.७ मिमी ३२.२ टक्के
सडक अर्जुनी २७५.८ मिमी २०.७ टक्के
...........................................................................................
एकूण अपेक्षित पाऊस : १२२०.३ मिमी
प्रत्यक्ष पडलेला पाऊस : २७१. ३ मिमी
पडलेल्या पावसाची सरासरी टक्केवारी : २२.५ टक्के