नाना पटोले : जिल्हा ओबीसी संघर्ष कृती समितीची आढावा बैठकगोंदिया : घटनेने अधिकार देऊनसुद्धा बहुसंख्य ओबीसी समुदाय आपल्या हक्क व अधिकारापासून वंचित आहे. आरक्षणातून ओबीसींना डावलण्याचा कुटील डाव हाणून पाडण्यासाठी ओबीसींनी एकत्रित येण्याची गरज आहे. स्कॉलरशिप आणि इतर समस्या यात अडकल्याने ओबीसी विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहेत. एससी आणि एसटी प्रवर्गानुसार ओबीसींनाही त्यांच्या हक्क व अधिकारासाठी स्वतंत्र मंत्रालयाची गरज आहे. या मंत्रालयासाठी ओबीसींना घेऊन लढा उभारू, असे मत खा. नाना पटोले यांनी व्यक्त केले. जिल्हा ओबीसी संघर्ष कृती समितीने आढावा बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत उपस्थित खा. नाना पटोले ओबीसींना एक होण्याच्या आवाहन करताना बोलत होते.पटोले पुढे म्हणाले, ओबीसींना स्वत:च्या हक्क व अधिकाराची जाणीव होणे आवश्यक आहे. समाजाची गरज न समजता स्वत:ची गरज समजून प्रत्येक ओबीसीने ओबीसी कृतीे समितीच्या लढ्यात सहभागी होऊन समाजऋण फेडावे. मागण्या पूर्ण होत नसतील तर प्रसंगी लढा उभारण्याची तयारीदेखील ठेवावी. लढ्याला आमचा पूर्ण पाठिंबा असेल, असेही ते म्हणाले. आढावा बैठकीदरम्यान जिल्हा ओबीसी संघर्ष कृती समितीचे एच.एच. पारधी, मनोज मेंढे, दुर्गेश रहांगडाले, खेमेंद्र कटरे, बंटी पंचबुद्धे, संजीव रहांगडाले, चंद्रकुमार बहेकार, राजीव ठकरेले, कृपाल रहांगडाले, आशिष नागपुरे, भेलावे, निलम हलमारे, त्रिभूववन पटले, हि.द. कटरे, भेलावे, पन्नालाल मचाळे आदी मोठ्या संख्येने ओबीसी बांधव उपस्थित होते. दरम्यान येत्या २५ जानेवारीला पुन्हा आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले असून या वेळी पुढील वाटचालीचे नियोजन केले जाणार आहे. या आढावा बैठकीला जिल्ह्यातील समस्त ओबीसींनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
ओबीसींच्या स्वतंत्र मंत्रालयासाठी लढा उभारणार
By admin | Published: January 07, 2016 2:25 AM