कोहमारा : देशी-विदेशी दारूचे दुकान (रेस्टारंट अँड बार) सुरू करण्यासाठी लागणारे ग्रामपंचायतीचे ना हरकत प्रमाणपत्र मिळविण्यासाठी गावातील, तसेच बाहेरील व्यक्तींमध्ये मोठी चढाओढ लागलेली पाहावयास मिळत आहे. या चढाओढीत बोलीही लावली जात असल्याची चर्चा आहे.
चिखली हे कोहमारा-वडसा राज्य मार्गावर बसलेले जेमतेम तीन ते चार हजार लोकसंख्येचे गाव. चिखली गटग्रामपंचायत असून, यात कोहळीटोला व बानटोला या गावाचा समावेश आहे. या ग्रामपंचायतची निवडणूक आठ-नऊ महिन्यांपूर्वी पार पडली. सध्या येथे महिला सरपंच कार्यरत आहे. ऑगस्ट महिन्याच्या नियमित मासिक सभेत अचानक बार उघडण्यासाठी ग्रामपंचायतीकडून लागणाऱ्या ना हरकत प्रमाणपत्रासाठी अर्ज चर्चेला आला. अर्ज चर्चेला येताच, महिला ग्रामपंचायत सदस्य चक्रावून गेले. या अर्जावर पुढील मासिक सभेत चर्चा करण्याचा निर्णय घेण्यात आला. ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत बार उघडण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र मिळण्यासाठीचा अर्ज आल्याचे गावातील नागरिकांना कळताच, अनेक गावकऱ्यांनी याला विरोध दर्शविल्याची माहिती आहे. दरम्यान, ना हरकत प्रमाणपत्र मिळविण्यासाठी विक्रेत्यांमध्ये प्रचंड चढाओढ पाहायला मिळत आहे. आतापर्यंत ग्रामपंचायतला १५ ते १६ अर्ज प्राप्त झाल्याची माहिती आहे, तर दारू दुकानांसाठी अर्ज येण्याचा ओघ सुरूच आहे. मात्र, आता अर्जांची संख्या वाढत असल्याने, कोणाला ना हरकत प्रमाणपत्र द्यावे, असा प्रश्न ग्रामपंचायतीसमोर निर्माण झाला आहे.
..........
एनओसी देऊ नये, यासाठी महिलांनी कसली कंबर
चिखली येथे परवानाधारक बार सुरू करण्यासाठी एनओसी देण्यात येऊ नये, यासाठी गावातील महिलांनी कंबर कसली आहे. देशी दारूचे दुकान आणि बीअरबार सुरू करण्याला तीव्र विरोध केला आहे. देशी दारू दुकान सुरू झाल्यास, गावातील वातावरण कलुषित होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
.........
ग्रामपंचायतीच्या भूमिकेकडे लक्ष
चिखली येथे दारू दुकान आणि बीअर बार सुरू करण्यासाठी ग्रामपंचायतीने ना हरकत प्रमाणपत्र देऊ नये, यासाठी गावातील महिलांनी ग्रामपंचायतकडे अर्ज केला आहे, तर या विषयाला घेऊन काहींच्या आशाही पल्लवीत झाल्या आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत यावर काय निर्णय घेते, याकडे लक्ष लागले आहे.