माणिकराव ठाकरे : आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी नेते-कार्यकर्त्यांना सल्लागोंदिया : काही चुकांमुळे आम्हाला केंद्र व राज्यातही सत्ता गमवावी लागली. भाजपने सर्वांना भूलथापा देत सत्ता मिळविली. पण कार्यकर्त्यांनी निराश होऊ नये. भाजप सरकारने जनतेला दिलेली आश्वासने हवेत विरत आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी ही बाब जनतेपर्यंत पोहोचवून आगामी जिल्हा परिषदेची निवडणूक एकजुटीने लढवावी आणि जिल्हा परिषदेवर काँग्रेसची सत्ता आणावी, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केले.येथील अग्रसेन भवनात सायंकाळी झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी मंचावर माजी मंत्री डॉ.नितीन राऊत, आ.गोपालदास अग्रवाल, माजी आ.रामरतन राऊत, सेवक वाघाये, डॉ.नामदेव उसेंडी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कटरे, डॉ.योगेंद्र भगत, डॉ.नामदेव किरसान, अशोक लंजे, झामसिंग बघेले, पी.जी.कटरे, पन्नालाल सहारे, उषा मेंढे, नवटवलाल गांधी, रजनी नागपुरे, छाया चव्हाण, प्रफुल्ल अग्रवाल यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी प्रदेशाध्यक्ष ठाकरे यांनी सत्ताधारी भाजप सरकारवर चांगलेच प्रहार केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधान मोदींच्या हातचे बाहुले असल्याचे सांगून राज्याची राजधानी मुंबईवर मोदींचा डोळा आहे. केवळ व्यापाऱ्यांचे हित जोपासणाऱ्या मोदी सरकारला शेतकऱ्यांचे दु:ख कळत नाही. आजही दररोज शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असताना हे सरकार काय करीत आहे? असा सवाल त्यांनी केला. निवडणुकीच्या काळात शेतकऱ्यांचा पुळका आलेले सरकार आता गप्प का? असेही ठाकरे म्हणाले. (जिल्हा प्रतिनिधी) साडेतीन तास उशिरा सुरूवातकाँग्रेस कार्यकर्त्यांचा हा मेळावा तब्बल साडेतीन तास उशिराने सुरू झाला. नियोजित कार्यक्रमानुसार हा मेळावा दुपारी १ वाजता सुरू होणार होता. मात्र ४ वाजून ४० मिनिटांनी प्रदेशाध्यक्षांचे सभास्थळी आगमन झाले. या मेळाव्यासाठी जिल्हाभरातून कार्यकर्ते व पदाधिकारी आले होते. मात्र प्रदेशाध्यक्षांची वाट पाहता पाहता कंटाळून अनेक कार्यकर्ते आल्या पावली परत निघून गेले. सत्ता गेली तरी मिजास कायम आहे का? असा प्रश्न करीत कार्यकर्त्यांची कुजबूज सुरू होती.वेळ बराच झाल्याने माजी मंत्री नितीन राऊत यांना भाषण आवरते घेण्याची सूचना करण्यात आली. मात्र प्रदेशाध्यक्ष ठाकरे यांचे भाषण सुरू झाले त्यावेळी ट्रेनने येणाऱ्यांची वेळ झाल्याने त्यांना भाषण सोडून उठावे लागले.सभेतील गर्दी कमी होत असल्याचे पाहून कार्यालयाचे ग्रीन बंद करून बाहेर जाणाऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी ओरडण्याचा आवाज वरच्या हॉलपर्यंत येत असल्यामुळे ग्रील उघडण्यात आले.इतर वर्क्त्यांनी हिंदीतून भाषण दिले असले तरी माणिकराव ठाकरे यांनी मराठीतून भाषण दिले. सुरूवातीला त्यांनी ‘मराठीतून बोलू की हिंदीतून’ असे विचारले. तेव्हा मराठीतून म्हणणाऱ्यांची संख्या जास्त होती. जिल्हा परिषद-पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी कोणासोबत आघाडी करायची हे स्थानिक स्तरावरच ठरवा पण एकजुटीने लढण्यात फायदा असल्याचा सल्ला माणिकराव ठाकरे यांनी दिला.या मेळाव्याला महिलांची संख्या खूपच नगण्य होती. तसेच शहरी कार्यकर्त्यांची संख्याही कमी दिसत होती. मंचावर स्थान मिळविण्यासाठी मात्र जिल्हाभरातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी एकच गर्दी केली होती. ज्यांना कोणताही जनाधार नाही असेही काही चेहरे नेहमीप्रमाणे मंचावर होते.
भाजपला रोखण्यासाठी एकजुटीने लढा
By admin | Published: January 17, 2015 10:59 PM