देवरी : आदिवासी विकास महामंडळ प्रादेशिक कार्यालय भंडारा येथील प्रभारी प्रादेशिक व्यवस्थापक अविनाश राठोड यांच्या विरुद्ध गैर व असभ्य वर्तणुकीचा आरोप लावून त्यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. दरम्यान चव्हाण यांना राठोड यांनी मानसिक त्रास दिल्याचा आरोप आहे. यातच त्यांचे ५ मे रोजी कोरोनाने निधन झाले. यामुळे राठोड यांच्याविरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी म.रा.सह. आदिवासी विकास महामंडळ कर्मचारी संघटनेने केली आहे.
आंदोलनामुळे संतापलेल्या राठोड यांनी भंडारा कार्यालय अंतर्गत येणाऱ्या देवरी कार्यालयाचे उपव्यस्थापक आर.पी. चव्हाण यांना त्यांच्या कामाबद्दल आक्षेप घेऊन त्यांच्यावर निलंबनाच्या कारवाईचा प्रस्ताव मुख्यालयात पाठविला. अशाप्रकारे चव्हाण यांचे मानसिक छळ करणे सुरू केले. यामुळे चव्हाण हे फार मानसिक तणावाखाली होते. याच दरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाली. चव्हाण यांचे ५ मे रोजी निधन झाले. राठोड यांच्याविरुद्ध लेखणीबंद आंदोलन केले. परंतु त्यांच्यावर अद्यापही कुठलीच कारवाई करण्यात आली नाही. यावरून संतापलेल्या अविनाश राठोड यांनी देवरी कार्यालयाचे उपव्यवस्थापक आर.पी. चव्हाण यांच्या कामाबद्दल आक्षेप घेत त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मुख्यालयाकडे पाठविल्याचा आरोप संघटनेने केला आहे. यामुळे चव्हाण यांच्या कुटुंबीयांना महामंडळाकडून १० लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात यावी आणि भंडाराचे प्रभारी व्यवस्थापक अविनाश राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना तत्काळ निलंबित करण्यात यावे, अशी मागणी म.रा.सह. आदिवासी विकास महामंडळ कर्मचारी संघटनेने केली आहे. या मागणीचे निवेदन वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविण्यात आले आहे.