लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : आयएनएस विक्रांतच्या नावावर कोट्यवधी रुपयांचा घोटाळा करणाऱ्या भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून अटक करावी, अशी मागणी जिल्हा शिवसेनेने केली. यासाठी शिवसेनेच्यावतीने गुरुवारी (दि.७) उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक देऊन निदर्शने करीत जोडे मारो आंदोलन केले. तसेच सोमय्यांवर कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले. सोमय्या यांनी सन २०१३ मध्ये आयएनएस विक्रांत वाचविण्यासाठी मोहीम सुरू करून सढळ हाताने मदत करण्यासाठी आवाहन केले होते. त्यासाठी त्यांनी प्रचंड निधी जमा करून तो निधी राजभवनात न देता स्वतःच्या स्वार्थासाठी वापरल्याची शंका व्यक्त होत आहे. किरीट सोमय्या यांनी हा प्रकार करून देशाशी एकप्रकारे गद्दारीच केल्याचे दिसून येत आहे. भाजपचे केंद्र सरकार राज्यातील महाविकास आघाडी सरकारविरुद्ध सुडाचे राजकारण करत आहे. तपास यंत्रणांचा गैरवापर करत आहे. अख्खा महाराष्ट्र हे उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. मात्र भाजपचाच नेता आणि याच केंद्रीय तपास यंत्रणांचा प्रवक्ता असल्यासारखा वावरणाऱ्या सोमय्या यांनी आयएनएस विक्रांत या नावाखाली गोळा केलेल्या पैशांचा घोटाळा करून देशाशी गद्दारी केली. या देशद्रोह्याची जागा तुरुंगातच असायला हवी. याबाबतचे सत्य जनतेसमोर आणावे व सोमय्याला तत्काळ अटक करावी, अन्यथा गोंदिया जिल्हा शिवसेनेच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. आंदोलनात महिला आघाडी संघटिका प्रीती देशमुख, जिल्हा संघटक अशोक आरखेल, तालुका संघटक संजू समशेरे, शहर संघटक विनीत मोहिते, जिल्हाध्यक्ष अल्पसंख्यक जाबिर शेख, अल्पसंख्यक शहरप्रमुख सलमान पठाण, अल्पसंख्यक उपजिल्हाप्रमुख शाहरुख पठान, ललित अतकरे, विवेक पारधी, आसू मक्कड, ऋषभ मिश्रा, अमनदीप भाटिया, विक्की बोमचेर, बालू तिघारे, दिनेश राऊत, महेंद्र बघेले यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जोडे मारून पोस्टर फाडले - या आंदोलनांतर्गत शिवसेना जिल्हाप्रमुख पंकज यादव यांच्या मार्गदर्शनात जिल्हा संपर्कप्रमुख मुकेश शिवहरे व जिल्हा समन्वयक सुनील लांजेवार यांच्या प्रमुख उपस्थितीत उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर सोमय्या यांच्या पोस्टरला जोडे मारून निदर्शने करण्यात आली. तसेच सोमय्या यांचे पोस्टर फाडून आंदोलन करण्यात आले. दरम्यान उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना मागण्यांचे निवेदन पाठविण्यात आले.