गोंदिया : मध्यप्रदेशातील कमी दर्जाच्या डीएपी खताची जिल्ह्यात सरार्सपणे विक्री केली जात होती. ही बाब समोर येऊन देखील गोंदिया तालुका कृषी अधिकारी कार्यालयाने याकडे दुर्लक्ष केले होते. मात्र लोकमतने हे प्रकरण लावून धरल्यानंतर तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरुन दवनीवाडा पोलीस स्टेशनमध्ये रतनारा येथील कृषी केंद्र चालका विरुध्द कमी दर्जाच्या खताची विक्री केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
गोंदिया तालुक्यातील रतनारा येथे मध्यप्रदेशातील कमी दर्जाच्या डीएपी खताची विक्री केली जात असल्याची माहिती कृषी विभागाच्या भरारी पथकाला मिळाली. यावरुन भरारी पथकाने रतनारा येथील कृषी केंद्रावर धाड टाकून ३७ चुंगड्या कमी दर्जाचे डीएपी खत जप्त केले होते. जप्त केलेल्या खताचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. प्रयोगशाळेच्या अहवाल प्राप्त झाला असून हे खत कमी दर्जाचे असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे तालुका कृषी अधिकारी धनराज तुमडाम यांच्या तक्रारीवरुन दवनीवाडा पोलिसांनी रतनारा येथील कृषी केंद्र चालकावर भादंवि कलम ४२०, ३४ आरडब्लू ७ अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ आरडब्ल्यू ७ रासायनिक खते (नियंत्रण) आदे १९८५ आरडब्ल्यू ३ (२) (डी) अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे. यामुळे मध्यप्रदेशातील कमी दर्जाच्या खताची जिल्ह्यात विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
...............
सर्वाधिक विक्री गोंदिया तालुक्यातच
दरवर्षी खरीप हंगामा दरम्यान मध्यप्रदेशातील कमी दर्जाच्या खते आणि बियाणांची विक्री गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर केली जाते. याला अनेक शेतकरी बळी पडतात. यंदा देखील खरीप हंगामात मध्यप्रदेशातील कमी दर्जाच्या डीएपी खताची गोंदिया जिल्ह्यात विक्री करण्यात आली. एकट्या गोंदिया तालुक्यात तीन चार ट्रक कमी दर्जाच्या डीएपी खताची विक्री झाल्याची माहिती आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात या खताची विक्री झाल्यानंतर कृषी विभागाच्या लक्षात ही बाब फार उशिरा आल्याने आश्चय व्यक्त केले जात आहे.
..............
शेतकऱ्यांनो खत खरेदी करताना घ्या काळजी
मध्यप्रदेशातील कमी दर्जाचे खत गोंदिया येथील बाजारपेठेत दाखल झाले आहे. त्यामुळे कृषी केंद्रामधून डीएपी व इतर खतांची खरेदी करताना ते खत ओरीजनल आहे किवा नाही याची खात्री करुन खरेदी करण्याचा सल्ला कृषी विभागाने शेतकऱ्यांना दिला आहे.