गोरेगाव (गोंदिया) : शेतात जाण्यासाठीचा रस्ता मोकळा करुन देण्याच्या मागणीसाठी प्रशासनाकडे पाच वर्ष पाठपुरावा केला. मात्र प्रशासनाने त्याची दखल न घेतल्याने शेतक-याने पाण्याच्या टाकीवर चढून विरुगिरी करित आत्महत्या करण्याचा इशारा दिला. ही घटना शुक्रवारी(दि.६) सकाळी ७ वाजताच्या सुमारास गोरेगाव तालुक्यातील भडंगा येथे उघडकीस आली. दुपारी ४ वाजेपर्यंत शेतकरी पाण्याच्या टाकीवरच बसून होता.कोमल प्रसाद कटरे, रा. भडंगा, असे वीरूगिरी करणा-या शेतक-याचे नाव आहे. त्यांच्या शेतात जाणारा रस्ता शेतक-याने बंद केला. त्यामुळे शेतात जाण्यासाठी रस्ता मोकळा करून देण्याच्या मागणीसाठी कटरे यांनी मागील ५ वर्षापासून प्रशासनाकडे पाठपुरावा केला. मात्र प्रशासनाने त्याची दखल घेतली नाही. परिणामी सदर शेतक-याला शेतात जाण्यासाठी अडचण निर्माण झाली आहे. प्रशासनाच्या दप्तर दिरंगाईच्या धोरणाला कंटाळून कोमल कटरे हा शेतकरी शुक्रवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास गावातील पाणी टाकीवर चढला. शेतात जाणारा रस्ता मोकळा करून दिला नाही तर आत्महत्या करण्याचा इशारा दिला. या घटनेची माहिती गावात पसरताच गावकरी मोठ्या संख्येनीे पाणी टाकीजवळ गोळा झाले. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच गोरेगावचे तहसीलदार तहसीलदार कल्याणकुमार डहाट हे कर्मचा-यांसह घटनास्थळी पोहोचले. कटरेची मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. मात्र यापूर्वी देखील प्रशासनाने आश्वासने देवून त्याची पूर्तता केली नाही. त्यामुळे आश्वासनावर माघार घेण्यास कटरेने नकार दिला.काय नेमके प्रकरणभंडगा येथील शेतकरी कोमल कटरे यांच्या शेतात लागूनच द्वारकाप्रसाद दमाहे यांची शेती असून कटरे यांच्या शेताला लागून सरकारी जमीन आहे. त्याच जमिनीतून कोमलप्रसाद कटरे यांच्या शेतात जाण्याचा रस्ता आहे. या रस्त्यावर व जागेवर द्वारकाप्रसाद दमाहे यांनी अतिक्रमण करुन रस्ता बंद केल्याचे कोमलप्रसाद कटरे यांचे म्हणणे आहे. गेल्या ५ वर्षापासून शासन व प्रशासनाला पुरावे सादर करुन अतिक्रमित जमिन शासन जमा करुन रस्ता मोकळा करुन द्या. यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा केला. शेवटी न्यायालयाच्या निर्णयानुसार १५ फुटांचा रस्ता कटरे यांना तहसीलदार कल्याणकुमार डहाट यांनी मिळवून दिला. पण हे प्रकरण द्वारकाप्रसाद दमाहे यांनी न्यायालयात प्रविष्ठ केल्यामुळे न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत रस्ता पुन्हा बंद केला. परिणामी कटरे यांची शेती गेल्या चार वर्षापासून पडीक आहे. त्यामुळे शेतक-यांनी हतबल होऊन शेवटी पाण्याच्या टाकीवर चढून न्याय द्या अन्यथा आत्महत्या करण्याचा इशारा दिला.अधिकारी कर्मचारी भंडगा येथेकोमल कटरे या वीरुगिरी करणा-या शेतक-याची समजूत घालण्यासाठी प्रशासनातर्फे प्रयत्न करण्यात आले. सायंकाळी पाच वाजेपर्यंत कटरे यांचे आंदोलन सुरूच होते. घटना स्थळावर पोलीस विभागाचा चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. तहसीलदार कल्याणकुमार डहाट, नायब तहसीलदार सोमनाथ माळी, तलाठी डहाट व तहसील कार्यालयाचे कर्मचारी उपस्थित होते.
पाण्याच्या टाकीवर चढून शेतक-याची वीरुगिरी, शेतात जाण्याचा रस्ता मोकळा करुन द्या
By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2017 5:52 PM