अर्जुनी मोरगाव : मागील पाच दिवसांपासून बंद असलेले कोरोना चाचणी केंद्र अखेर मंगळवारी ग्रामीण रुग्णालयात सुरू झाले. कोरोना चाचणी केंद्र झाल्याने जनतेला दिलासा मिळाला आहे. पूर्व परवानगी न घेता पाच दिवसांपर्यंत हे केंद्र का बंद होते याचा मात्र अद्याप उलगडा होऊ शकला नाही.
उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले यांनी वैद्यकीय अधीक्षकांना यासंदर्भात स्पष्टीकरण विचारल्याची माहिती आहे.
अर्जुनी मोरगाव तालुक्याच्या प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण भागात कोरोना चाचण्या सुरळीत सुरू होत्या. मात्र अर्जुनी मोरगाव शहरातील चाचण्या गेल्या पाच दिवसांपासून बंद होत्या. त्या कुणाच्या परवानगीने बंद केल्या याचे रहस्य गुलदस्त्यात आहे. पत्रकारांनी सोमवारी ही बाब उपविभागीय अधिकारी सोनाले यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांनी तडक तहसीलदार विनोद मेश्राम यांच्यासोबत ग्रामीण रुग्णालयात भेट दिली. वैद्यकीय अधीक्षकांना विचारणा केल्यावर त्यांनी मनुष्यबळाची कमतरता असल्याने बंद केल्याचे सांगितले. तालुका आरोग्य अधिकारी विजय राऊत यांनी या कार्यासाठी एक कर्मचारी देण्याचे मान्य केले. अखेर मंगळवारी सकाळी ग्रामीण रुग्णालयात कोरोना चाचण्या सुरू करण्यात आल्या. कोरोना चाचण्या तातडीने सुरू करण्यासंदर्भात भाजपच्या जिल्हा महिला उपाध्यक्ष किरण कांबळे यांनी मागणी केली होती. लोकमतने सातत्याने पाठपुरावा केला. अखेर हे केंद्र सुरू झाल्याने जनतेत समाधान व्यक्त केले जात आहे. उपविभागीय अधिकारी सोनाले यांनी वैद्यकीय अधीक्षकांना स्पष्टीकरण विचारले असून, अहवाल वरिष्ठांना सादर केला जाणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे.