सडक अर्जुनी : तालुक्यातील डव्वा येथील महाराष्ट्र बँकेच्या अडेलतट्टू धोरणामुळे १० ते १२ अपंग लोकांचे मानधन अडले होते. पळसगाव येथील माजी सरपंच उदयकुमार कावळे यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिल्यामुळे अपंगांना मानधन मिळाले आहे.
अपंगत्व प्राप्त लाभार्थ्यांचे आर्थिक सहाय्यक अनुदान शासनातर्फे प्रदान करण्यात येते. डव्वा परिसरातील अपंग व्यक्तीचे अर्थसहाय्य महाराष्ट्र बँक शाखा डव्वा येथून प्राप्त होतात. परंतु महाराष्ट्र बँकेने लाभार्थ्यांना अनुदान प्राप्त करण्यासाठी पालकत्व प्रमाणपत्राची अट घालून ते सादर केल्याशिवाय लाभार्थ्यांना खातेही उघडता येणार नाही व अनुदानही प्राप्त होणार नाही अशी अट ठेवली होती. सध्या कोरोनाचा संसर्ग सुरू असल्यामुळे लाभार्थ्यांना प्रमाणपत्र न्यायालयातून आणणे कठीण असल्यामुळे ती अट सध्यातरी शिथिल करावी व अत्यंत गरजू असलेल्या अपंग लाभार्थ्यांना त्यांचे अर्थसहाय्य देण्यात यावे, अशी विनंती पळसगाव (डव्वा) येथील उदयकुमार कावळे यांनी महाराष्ट्र बँकेचे शाखा व्यवस्थापक यांना केली. त्याची प्रत जिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी गोंदिया व तहसीलदार सडक अर्जुनी यांना देण्यात आल्या. यानंतर शाखा व्यवस्थापक मानत नसल्यामुळे त्यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिल्यानंतर अपंगांना आपल्या हक्काचे अर्थसहाय्य प्राप्त झाले.
..................