गोंदिया : मुख्याधिकाऱ्यांच्या ‘बिझी शेड्युल’मुळे रखडत असलेल्या करवसुली मोहिमेला अखेर नव्याने गठित करण्यात आलेल्या पथकाने सोमवारपासून (दि.१९) श्रीगणेशा केला. पथकाने पहिल्या दिवशी शहरातील श्रीनगर, गौतमनगर व रामनगर परिसरात फिरून एक लाख १८ हजार रुपयांची वसुली केली. ११ कोटींच्या करवसुलीचा डोंगर डोक्यावर असलेल्या नगर परिषदेची वसुलीसाठी धडपड सुरू आहे. त्यातल्या त्यात जिल्हाधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांचे कर वसुलीच्या कारणास्तव पगार अडविल्याने वसुलीचे प्रकरण अधिकच गंभीर झाले आहे. अशात वसुलीसाठी पालिकेत सात सदस्यीय करवसुली पथक गठित करण्यात आले आहे. मुख्याधिकारी सुमंत मोरे यांच्या नेतृत्वातच १६ डिसेंबरपासून करवसुली मोहिम सुरू करण्याचे नियोजित होते. मात्र मुख्याधिकारी मोरे कामात व्यस्त असल्याने या मोहिमेला मुहूर्त मिळत नव्हता. यातून एक- एक दिवस खोळंबत चालला होता. अशात पालिकेने गठित केलेल्या कर वसुली पथकाने सोमवारपासून (दि.१९) मुख्याधिकाऱ्यांविनाच मोहीम सुरू केली. मोहिमेच्या पहिल्या दिवशी पथकाने शहरातील श्रीनगर, गौतमनगर व रामनगर परिसर गाठले. याअंतर्गत पथकाने पहिल्या दिवशी ४० हजार रुपये रोख व ७८ हजार रूपयांचे धनादेश मिळविले. भेटीदरम्यान काहींनी कार्यालयात कर जमा करण्याचे आश्वासन दिले. सोमवारच्या करवसुली मोहीमेत पथकातील विधी सर्वेक्षक रवी लिमये, कर आकारणी विभागातील संतोष ठवरे, भविष्य निर्वाह निधी विभागाचे माणिक रहमतकर, प्रभारी अग्निशमन अधिकारी प्रकाश कापसे, बाजार निरीक्षक मुकेश मिश्रा, कर निरीक्षक श्याम शेंडे व आरोग्य निरीक्षक गणेश हतकय्या यांचा समावेश होता. (शहर प्रतिनिधी)
अखेर करवसुलीचा श्रीगणेशा
By admin | Published: January 20, 2015 12:07 AM