लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : निवडणूक आचारसंहितेत अडकलेल्या खरीप हंगामाच्या आधारभूत धान खरेदी प्रक्रियेला मार्गी लावण्यासाठी खा. प्रफुल पटेल यांनी शासनाकडे सतत पाठपुरावा केला. त्यामुळे मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळाला धान खरेदी करण्याच्या सूचना केल्या. परिणामी जिल्हाधिकाऱ्यांनी मार्केटिंग फेडरेशनच्या १८० पैकी ७६ तर आदिवासी विकास महामंडळाच्या ४१ केंद्रांना परवानगी दिली आहे. उर्वरित केंद्रही लवकरच सुरु करण्यात येणार आहेत.
पूर्व विदर्भात धानाची सर्वाधिक लागवड केली जाते. सध्या खरीप हंगाम अंतिम टप्प्यावर आहे. अल्प मुदतीच्या धानाची कापणी व मळणी सुरु झाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी दिवाळीपूर्वी धानाची कापणी व मळणी केली. पण आधारभूत केंद्र सुरु न झाल्यामुळे शेतकऱ्यांपुढे विक्रीचा प्रश्न निर्माण झाला होता. ही बाब माजी आ. राजेंद्र जैन व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी खा. प्रफुल पटेल यांच्या निदर्शनास आणून दिली. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असलेल्या खा. प्रफुल पटेल यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वी राज्य सरकारसह प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला. त्यानंतर दिवाळीपूर्वी धान खरेदी सुरु करण्याच्या सूचना केल्या. पण विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यामुळे धान खरेदी केंद्र सुरु करण्याच्या प्रक्रियेला विलंब झाला होता. तरी खा. प्रफुल पटेल यांनी पाठपुरावा सतत सुरु ठेवला. परिणामी पणन विभागाने धान खरेदी केंद्र सुरु करण्याच्या सूचना केल्यात. जिल्हाधिकाऱ्यांनी मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळाने धान खरेदीला सुरुवात केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण दूर झाली.
नोंदणी करून केंद्रावरच धान विक्री कराराजेंद्र जैन खा. प्रफुल पटेल यांच्या पाठपुराव्यामुळे धान खरेदीला सुरुवात झाली आहे. फेडरेशनच्या ७६ व आदिवासी विकास महामंडळाच्या ४१ केंद्रावर खरेदीसाठी नोंदणी प्रक्रिया सुरु करण्यात आली. आतापर्यंत १४ हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी धान विक्रीसाठी त्वरित नोंदणी करावी जेणे करून शेतकऱ्यांना लाभ घेता येईल, असे माजी आ. राजेंद्र जैन यांनी कळविले आहे.