बोंडगावदेवी : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवनियुक्त ग्रामपंचायत सरपंच ४ दिवसीय प्रशिक्षणासाठी नागपूरला गेले होते. आपलीही एक सामाजिक बांधिलकी समजून गरजूंना मदत करण्यासाठी प्रशिक्षणार्थी सरपंचांचे हात पुढे सरसावले. वानामती प्रशिक्षण केंद्रातील एका कामगाराचा कोविडमुळे मृत्यू झाल्याने त्याचा संसार उघड्यावर पडला. त्यांच्या कुटुंबाला आर्थिक हातभार लागावा या उदात्त हेतूने तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंचांनी प्रशिक्षणाच्या समारोप प्रसंगी आर्थिक मदत करून सामाजिक बांधिलकी जपण्याचा सुवर्णयोग साधला.
तालुक्यातील अलीकडेच निवडून आलेल्या ग्रामपंचायत सरपंचांचे ४ दिवसीय निवासी प्रशिक्षण नागपूर येथील वानामती प्रशिक्षण केंद्रात घेण्यात आले. राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान अंतर्गत यशवंतराव चव्हाण विकास प्रबोधिनी यशदा पुणे यांच्या वतीने नागपूर येथे हे प्रशिक्षण घेण्यात आले. यामध्ये बोंडगावदेवीच्या सरपंच प्रतिमा बोरकर, सिलेझरीच्या सुनीता ब्राम्हणकर, माहुरकुडाचे लक्ष्मीकांत नाकाडे, केशोरीचे नंदकुमार गहाणे, बाराभाटीचे महादेव प्रधान, कुंभीटोलाचे हिवराज औरासे, बोरीचे मधुकर ठाकरे, कन्हाळगावचे जयपाल ताराम, परसटोलाचे रामू कुंभरे, बोंडगाव (सुरबन)चे पुष्पा डोंगरवार, इळदाचे संगीता कळयाम सहभागी झाले होते. ४ दिवसीय प्रशिक्षणाच्या समारोप प्रसंगी वनामती प्रशिक्षण केंद्रातील एका कामगाराचे निधन झाल्यामुळे त्याच्या कुटुंबांना आर्थिक मदत करून आपलाही खारीचा वाटा त्या कुटुंबाला लागावा या भावनेतून दोन हजार ३०० रुपयांची सहानुभूती मदत प्रशिक्षण केंद्र संचालक लीलाधर पटले, प्रशिक्षक विनय पाटील, स्मार्ट ग्राम कढोलीचे सरपंच प्रांजल वाघ यांच्या उपस्थितीत सुपूर्द करण्यात आली. इतरांना मदत करून त्यांना झालेल्या दु:खात सहभागी झाल्याचा प्रत्यय तालुक्यातील सरपंचांनी दाखवून दिला.