अर्जुनी-मोरगाव : शहरातील मुख्य मार्गावर असलेल्या राजेश सायकल दुकानाला शुक्रवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास आग लागली. या आगीत सायकल व इतर साहित्य जळून खाक झाले. बाहेरून अग्निशमन दलाला पाचारण केल्यानंतर आग विझविण्यात यश आले. मात्र, या आगीत सायकल दुकानातील संपूर्ण साहित्य जळून राख झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले.
शुक्रवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट व पाऊस झाला. वादळामुळे शहरातील वीज बंद होती. स्थानिक अर्बन बँकेनजीक राजेश सायकल स्टोअर आहे. या दुकानातून धुराचे लोट निघत असल्याचे कुणीतरी बघितले. बघता-बघता आगीने रौद्र रूप धारण केले. शहरातील सेवाभावी मंडळींनी आग विझविण्याचा बराच प्रयत्न केला. अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. काही तासांनंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. मात्र, तोपर्यंत दुकानातील बऱ्याच सायकली व इतर साहित्य जळून खाक झाले होते. नेमकी आग कशामुळे लागली याचा तपास सुरू आहे.
......
अग्निशमन वाहनाची गरज
शहरात व तालुक्याच्या इतर गावांत आगीच्या अनेक घटना घडत असतात. मात्र, तालुक्यात एकही अग्निशमन वाहन नाही. मागील काळात अग्निशमन वाहन खरेदीचा नगरपंचायतने प्रस्ताव तयार केला होता. नंतर कुठे घोडे अडले कुणास ठाऊक? तालुक्याच्या ठिकाणी अग्निशमन वाहन नसणे ही दुर्दैवी बाब आहे. घटना घडल्यानंतर बाहेरून अग्निशमन दलाला बोलवावे लागते. एखादी घटना घडल्यानंतरच अग्निशमन वाहनाचे स्मरण होते. दोन दिवस चर्चाही होते. नंतर पदाधिकारी व प्रशासनालाही त्याचा विसर पडतो. कदाचित ही सुविधा असती, तर वेळीच आगीवर नियंत्रण मिळवून मोठ्या प्रमाणात झालेले नुकसान टाळता येऊ शकले असते.