दोन लाख रुपयांचे सामान जळाले: मदत करण्याची मागणी लोकमत न्यूज नेटवर्क सडक-अर्जुनी : तालुक्यातील खोडशिवनी येथे २४ मेच्या रात्री ८.३० वाजता शामराव सिंधी मेश्राम व शांता सिंधी मेश्राम यांच्या घरांना आग लागून २ लाख रुपये किमतीचे सामान जळून खाक झाले. यामध्ये शामराव सिंधी मेश्राम यांचे घर पूर्णपणे जळाले. दीड तासांच्या अथक परिश्रमानंतर गावकऱ्यांनी मदत करुन आगीवर नियंत्रण मिळविले. अन्यथा मोहल्ल्यातील कवेलूंची सर्व घरे जळून खाक झाली असती. शामराव सिंधी मेश्राम सहकुटुंब गावातील लग्नकार्यात जेवनासाठी गेले होते. अशातच अचानक रात्री ८.३० वाजता त्यांच्या घराच्या मागील भागातून धूर येत असल्याचे लोकांना दिसले. आग लागल्यानंतर गावातील युवक आग विझविण्याकरिता गेले असता त्यांच्या घरी गॅस सिलेंडर असल्याचे समजले. त्यामुळे काही वेळ बचावकार्यात अडथडा निर्माण झाला. काही लोकांनी धाडस करुन मागील दरवाजा तोडला व गॅस सिलेंडर बाहेर काढले. नंतर गावातील मोटार पंप व ग्रामपंचायतने पाणी पुरवठ्याचे नळ सुरु करुन पाणी टाकायला सुरुवात केली. एकंदर १०० पेक्षा जास्त लोकांनी सामूहिक प्रयत्न करुन दीड तासांच्या अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळविले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. आगीमध्ये ३ क्विंटल तांदूळ, २ हजारांचे बॅड पार्टीचे सामान, मुलाच्या लग्नात मिळालेले आंदन असे एकूण २ लाख रुपयांचे सामान जळून खाक झाले. तर १५ ग्रॅम सोन्याचे दागिने अजूनही आगीतून मिळालेले नाही. त्यामुळे शामराव यांचे कुटुंब पूर्णपणे निराधार झाले आहे. त्यांना शासकीय योजनेतून घरकूल देण्यात यावे, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. तर शांताबाईच्या लागून असलेले अर्धे घर जळाले. रात्रीला महसूल विभागाचे कर्मचाऱ्यांनी येऊन पाहणी केली. याप्रसंगी सरपंच अर्चना भैसारे, पोलीस पाटील भृंगराज परशुरामकर, उपसरपंच मनोहर परशुरामकर, तलाठी खोडवे, खंडविकास अधिकारी टेंभरे, जि.प. सदस्य रमेश चुऱ्हे यांनी पीडित कुटुंबाची भेट घेऊन एक हजार रुपयांची आर्थिक मदत केली. तसेच शासनाने नुकसान भरपाई द्यावे व त्यांचे नाव घरकूल यादीमध्ये समाविष्ट करुन विशेष बाब म्हणून घरकूल मंजूर करावे, अशी मागणी केली. पावसाळा समोर असून सदर कुटुंबाला राहण्याची समस्या निर्माण झाली आहे.
खोडशिवनी येथे घराला आग
By admin | Published: May 27, 2017 12:39 AM