आधुनिक उपकरणांचा उपयोग : १६० फायर ब्लोअर मशीन्स उपलब्धगोंदिया : जंगलात लागणाऱ्या आगीमुळे होणारे नुकसान थांबविण्यासाठी दरवर्षी नियोजन केले जाते. यावर्षी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी वनविभागाने विशेष तयारी केली आहे. फायर वॉचर्स चमूच्या साह्याने योग्य उपाययोजना करून फायर ब्लोअर्स व फायर इंजिनच्या मदतीने आग नियंत्रित केली जाणार आहे. त्यातच सेटेलाईटच्या माध्यमातून जंगलावर नजर ठेवली जाईल. यात यावर्षी ४४ फायर वॉचर्सची निवड करण्यात आली असून, १६० फायर ब्लोअर मशीनचा उपयोग केला जाईल.विशेष म्हणजे दरवर्षी विविध कारणांमुळे जंगलात आग लागते. यात कोट्यवधी रूपयांचे नुकसान वनविभागाला सहन करावा लागतो. तसेच वन्यप्राण्यांचे जीवसुद्धा जाते. यासाठी वनविभागाने उपाययोजना करून आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी जनजागृती अभियान चालविण्याचे कार्य वन विभागाच्या वतीने केले जात आहे. नागरिकांमध्ये वनाच्या संदर्भात आपुलकी निर्माण व्हावी, वनांच्या महत्वाची जागृती यावी, यासाठी जनजागृती अभियान राबविले जात आहे. जिल्ह्यात गोंदिया, गोरेगाव, सडक-अर्जुनी, आमगाव, तिरोडा, अर्जुनी-मोरगाव, सालेकसा, देवरी, दक्षिण देवरी, गोठणगाव, नवेगावबांध, चिचगड अशा १२ वनक्षेत्र व डेपो डोंगरगाव, नवेगावबांध अंतर्गत एक लाख ७३ हजार हेक्टर क्षेत्रफळ वनविभागांतर्गत येते. यापैकी काही भाग अतिसंवेदनशील क्षेत्रात मोडते. दरवर्षी जिल्ह्यात आगीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येते. त्यावर मात करण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने मागील पाच वर्षांपासून संपूर्ण वनक्षेत्रात उपग्राद्वारे नजर ठेवली जात आहे. त्यातच सन २०१४ मध्ये जिल्ह्यात फायर वॉचर्सची निवड करून नियमित पाहणी करून प्रतिबंधात्मक उपाययोजना केली जात आहे. यावर्षी १२ रेंज व दोन डेपो मिळून ४४ फायर वॉचर्सच्या चमूची निवड करण्यात आली आहे. यात एका चमून पाच कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याची माहिती आहे. स्थानिक मजुरांनाही यात प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यांच्या मदतीसाठी वन रक्षक, वन मजुरांनाही कामावर लावण्यात येणार आहे. विशेष म्हणजे शासनाकडून वन विभागाला फायर ब्लोअर मशीन्स व फायर ब्लोअर इंजिन देण्यात आल्याने सध्या गोंदिया वन विभागाकडे १६० फायर ब्लोअर मशीन उपलब्ध झाले आहेत.
फायर वॉचर्स करणार रक्षण
By admin | Published: February 17, 2017 1:51 AM