गोंदिया : कोरोनाकाळात आपला जीव धोक्यात घालून सतत शहरवासीयांच्या आरोग्यासाठी झटणाऱ्या नगरपरिषद, अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकारी राजशे खवले यांच्या हस्ते बुधवारी (दि.७) कोरोनायोद्धा म्हणून सन्मान करण्यात आला.
राज्यात १३ मार्च २०२० पासून रोग प्रतिबंधात्मक कायदा १९८७ लागू करण्यात आला आहे. तेव्हापासूनच अग्निशमन विभागातील कर्मचारी शहरात सॅनिटायझेशन करणे, कंटेन्मेंट झोनमध्ये प्रत्येक घर सॅनिटायझर करणे यासह अन्य जबाबदाऱ्या आपल्या जीव धोक्यात घालून पार पाडत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी अग्निशमन अधिकारी लोकचंद भांडारकर यांच्यासह १९ कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकारी खवले, उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते व मुख्याधिकारी करण चव्हाण यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व बोधचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यासोबतच, कर प्रशासनिक अधिकारी विशाल बनकर, उपअभियंता रवींद्र कावडे, आरोग्य निरीक्षक गणेश हतकय्या, मुकेश शेंद्रे, मनीष बैरिसाल व सहायक कर निरीक्षक प्रदीप घोडेस्वार यांनाही सन्मानित करण्यात आले.