गोंदिया : नगर परिषदेचे माजी नगरसेवक लोकेश (कल्लू) यादव यांच्यावर ११ जानेवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास गोळीबार करून त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न दोन अज्ञात मारेकऱ्यांनी केला. गोळीबार करून दुचाकीवर असलेल्या दोघांनी दुचाकी घेऊन सुसाट वाहन चालवित पळ काढला. ही घटना त्यांच्याच घराजवळील सावलानी किराणा दुकानाजवळ हेमू कॉलनी चौकात घडली. या घटनेसंदर्भात गोंदिया शहर पोलिसांनी दोन मारेकऱ्यांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे शहर अध्यक्ष तथा माजी नगरसेवक लोकेश (कल्लू) यादव (४२) रा. बाराखोली सिंधी कॉलनी गोंदिया हे आपल्या राहत्या घरातून मोटारसायकलने बाहेर जाण्यासाठी सकाळी ११ वाजता घरून निघाले. त्यांच्यावर एका मोटारसायकलवर असलेल्या दोन अनोळखी तरुणांनी गोळीबार केला. गोळीबार करून आरोपी लगेच दुचाकीने भरधाव वेगात पसार झाले. या गोळीबारात लोकेश यादव यांच्या कमरेला उजव्या बाजूला गोळी लागली आहे. तो गोळी लागताच रस्त्याच्या किणाऱ्यावर मोटार सायकलवरून खाली पडताना दिसल्याने लक्की आणि मोल्ल्यातील नितेश केशवानी यांच्या मदतीने लोकेश यादव यांना उपचारासाठी गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी नेण्यात आले. प्रथमोपचार करून त्यांना लगेच नागपूरला हलविण्यात आले. त्यांची प्रकृती गंभीर आहे.
लोकेश उदगारला ‘तु उनको पकड, उन्होने मुझे गोली मारी है’
नेहमीप्रमाणे लक्की यादव आपल्या कामानिमीत्त चिरचाळबांध येथे जाण्यासाठी निघाला असतांना लोकश यादव याचवेळी दुचाकीवरून खाली पडतांना दिसल्याने लक्की मदतीसाठी धावला. त्यावेळी लोकेश यादव यांनी दोन तरूण एका काळया रंगाच्या हिरो स्प्लेंडर मोटार सायकलवर बसून वेगाने त्यांच्याच घराचे दिशेने जांताना दिसले. त्यावेळी लोकेश यादव यांनी डाव्या हाताने मोटार सायकलस्वारांच्या दिशेने इशारा करुन ‘तु उनको पकड, उन्होने मुझे गोली मारी है’ असे म्हणाले. परंतु ते खूप जोरात मोटार सायकल चालवित असल्याने त्यांना पकडता आले नाही. लक्की लागलीच लोकेश जवळ गेला त्यावेळी लोकेश यादव जमीनीवर खाली पडले होते. त्यांचे कमरेच्या उजव्या बाजूला हाताने पकडून ठेवले होते.
एक जांभळ्या रंगाचा तर दुसरा क्रिम रंगाचा जॅकेट परिधान केला होता
लोकेश यादव यांच्यावर गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींपैकी एक आरोपी जांभळ्या रंगाचा जॅकेट घातलेला होता. त्याच्या गळ्याभोवती निळया रंगाचा गमचा होता. मोटार सायकलवर मागे बसलेल्या व्यक्तीने क्रिम रंगाचे जॅकेट घातले होते. त्या आरोपींना लक्की यांनी आपल्या डोळ्याने पाहिले आहे.
आरोपींवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा
माजी नगरसेवक लोकेश यादव यांच्यावर गोळीबार करणार्या दोन आरोपींवर गोंदिया शहर पोलिसात भादंविच्या कलम ३०७, ३४ सहकलम ३, २५ भारतीय हत्यार कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी परिसरातील सर्व सिसिटीव्ही तपासून आरोपींना पकडण्यासाठी त्यांची छायाचित्र आपल्या मोबाईलमध्ये घेतली आहेत.
शहरात तणावाचे वातावर
या घटनेची माहिती गोंदिया शहरात वाऱ्यासारखी पसरली. लोकांनी घटनास्थळी व नंतर के.टी.एस. जिल्हा शासकीय रुग्णालयात एकच गर्दी केली होती. काही काळ संपूर्ण शहरात तणावाचे वातावरण होते. सराफा लाईन येथील दुकाने बंद करण्यात आली होती. पोलिसांनी लगेच संवेदनशील क्षेत्रात बंदोबस्त तैनात केल्यामुळे वातावरण शांत झाले. काही ट्यूशन क्लास चालविणाऱ्या लोकांनी आपल्या विद्यार्थ्यांना सुट्टी दिली.
तपासासाठी सहा पथके रवानामाजी नगरसेवक लोकेश यादव यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपींच्या शोधासाठी गोंदिया शहर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा यांचे प्रत्येकी तीन असे सहा पथक तपासासाठी रवाना झाले आहे. आरोपींच्या मागावर गोंदिया जिल्हा पोलिस आहेत.