सालेकसा : राज्यात जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा तसेच खासगी अनुदानित, विना अनुदानित, स्वयं अर्थसहाय, राज्य मंडळ आणि केंद्रीय मंडळाच्या शाळा व महाविद्यालये सोमवारी २७ जुलै रोजी सुरू झाली. शाळेची पहिली घंटा वाजली. मात्र शाळेचा पहिला दिवस गणवेशाविनाच गेला.आता प्रत्येक शाळेत किलबिल सुरू होत आहे. मुलांमध्ये शाळेत जाण्यासाठी उत्साह वाढविण्यासाठी तसेच जि.प.च्या शाळांकडे पालकांचा कल वाढावा म्हणून शाळेच्या पहिल्या दिवसीच सर्व मुलांना गणवेश वाटप करण्यात येईल, अशी घोषणा शासनातील शिलेदारांनी केली होती. परंतु त्यांची हा दावा सपशेल फोल ठरला आहे. शासनाने केलेल्या घोषणेप्रमाणे सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांच्या खात्यावर मुलांच्या गणवेशाची रक्कम थेट जमा करण्यात येईल आणि शाळा उघडण्यापूर्वी कपडे शिऊन सर्व विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी वाटप करण्यात येईल, असे नियोजन होते. परंतु शासनाचे नियोजन टाय-टाय फिस्स करण्याचे काम प्रशासनाने केले आहे. सोमवारी २७ जुलै रोजी शाळेच्या पहिल्याच दिवशी अनेक शाळेत मुलांना गणवेश मिळाले नसल्याचे चित्र सालेकसा तालुक्यासह जिल्ह्यातसुध्दा दिसून आले. शाळा उघडताच पुस्तक आणि गणवेश देऊन नवागतांसह सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत सत्कार करण्याची तयारी प्रत्येक शाळेत होणार होती. शाळेत पुस्तका उपलब्ध झाल्या आहेत, गणवेशाबद्दल शासनाने निर्णय घेताना असे ठरविले की प्रति विद्यार्थ्यांमागे दोन दोन जोडी विद्यार्थ्यांना गणवेश देण्यात येईल. यासाठी एका विद्यार्थ्यांच्या नावे दोन जोडे गणवेशासाठी ४०० रुपये याप्रमाणे एकूण रक्कम मुख्याध्यापक यांच्यासह शाळेच्या बँक खात्यावर जमा करण्यात आले. शाळा सुरू होण्याच्या दोन दिवसांपूर्वी सालेकसा तालुक्यातील अनेक मुख्याध्यापकांशी संपर्क केला असता त्यांनी पहिल्या दिवशी गणवेश देण्यासाठी असमर्थता दर्शविली. या मागचे कारण विचारले असता त्यांनी सांगितले की, शाळा सोमवारी २७ जून रोजी सुरू होत असून आता काल, परवा गुरूवार, शुक्रवारपर्यंत गणवेशाची रक्कम खात्यात जमा झाली. रक्कम झाल्यावर शाळा व्यवस्थापन समितीची सभा बोलाविण्यात आली. गणवेश वाटपाचा ठराव पास करणे, कापड खरेदी करणे या प्रक्रियेला साधारणत: चार दिवस लागतात. त्यानंतर शिंप्याकडे देणे, शिंपी आठ दिवसांपेक्षा जास्त वेळ लावतो, अशात तीन दिवसात हे सगळे शक्य नाही. त्यामुळे पहिल्या दिवशी गणवेश देणे शक्यच नाही. जर शासनाने पहिल्या दिवशी गणवेश देण्याचा निर्धार केला तर कमीत कमी पंधरा ते वीस दिवसांपूर्वीच खात्यावर रक्कम जमा करणे आवश्यक होते. परंतु तसे केले नाही, असे सांगण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)
शाळेचा पहिला दिवस गणवेशाविनाच
By admin | Published: June 29, 2016 1:49 AM