गोंदिया : कोरोना लसीकरण मोहिमेच्या पहिल्या दिवशी शनिवारी (दि.१६) जिल्ह्यात २१३ फ्रंटलाईन कोरोना वॉरियर्सला लसीचा पहिला डोज देऊन मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यामध्ये खासगी व शासकीय अशा ५३ डॉक्टर्सचा समावेश असून, उर्वरित नर्सिंग व पॅरामेडिकल स्टाफचा समावेश आहे.
शनिवारी अवघ्या देशातच कोरोना लसीकरणा मोहिमेला सुरुवात करण्यात आली. यांतर्गत जिल्ह्यातही लसीकरणाला सुरुवात करण्यात आली असून, पहिल्या ३०० वॉरियर्सला लस देण्याचे नियोजन होते. यासाठी येथील वैद्यकीय महाविद्यालय, तिरोडा येथील उपजिल्हा रुग्णालय व देवरी येथील ग्रामीण रुग्णालयात प्रत्येकी १०० वॉरियर्सला लस दिली जाणार होती, मात्र २१३ वॉरियर्सला लस देण्यात आली. यात येथील वैद्यकीय महाविद्यालयात ६४, देवरी येथील ग्रामीण रुग्णालयात ६४, तर तिरोडा येथील उपजिल्हा रुग्णालयातील केंद्रावर ८५ वॉरियर्सला लस देण्यात आली. लस देण्यात आलेल्या या कोरोना वॉरियर्समध्ये ५३ खासगी व शासकीय डॉक्टर्स, ७२ नर्सिंग स्टाफ, तर ८८ पॅरामेडिकल स्टाफ व अन्यांचा यात समावेश आहे. विशेष म्हणजे, लस देण्यात आलेल्या २१३ कोरोना वॉरियर्समध्ये कुणालाही लस दिल्यानंतर काहीच त्रास जाणवला नसल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन कापसे यांनी दिली.