खैरलांजीची जि.प.शाळा : शाळेला शिक्षक देण्याची मागणी लोकमत न्यूज नेटवर्क परसवाडा : ग्राम खैरलांजी येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा ही ५० वर्षे जुनी शाळा असून या सत्रात मात्र पहिल्या वर्गात विद्यार्थी संख्या ‘शून्य’ आहे. यामुळे शाळेतील पहिला वर्ग बंद झाला आहे. जिल्ह्यातील ही पहिलीच घटना असावी. असे असतानाही केंद्र प्रमुख खोब्रागडे यांनी गावात जाऊन पालकांची समजूत घालण्याचे सौजन्यही दाखविले नाही. शिवाय वरिष्ठांना साधी कल्पनाही दिली नाही. यातून ते किती कर्तव्य तत्परतेने कार्य करीत आहे याची प्रचिती येते असे बोलले जात आहे. शाळेत १९ आॅक्टोबर २०१६ रोजी अपघातात एक विद्यार्थी ठार झाला होता. तर त्याची बहीण जखमी झाली होती. प्रकरणी जिल्हा प्रशासनाने शिक्षकांवर ठपका ठेवून तीन शिक्षकांना निलंबीत केले होते. पण शाळेत शिकवायसाठी आजही शिक्षक दिले नाही. यामुळेच पालकांनी आपल्या पाल्यांच्या अभ्यासाचा विचार करता त्यांना खाजगी शाळेत बाहेरगावी दाखल केले. यंदा भरतीस पात्र ११ विद्यार्थी होते व सर्वांचे प्रवेश बाहेर करण्यात आले. कित्येकदा शाळा व्यवस्थापन समितीने पत्र व्यवहार, प्रत्यक्ष भेट, आमदार, खासदार यांच्या जनता दरबारात शिक्षकांचा प्रश्न उपस्थित केला. यावर अधिकाऱ्यांनी तात्पुरती होकार दिली. मात्र शाळेला शिक्षक न देता लोकप्रतिनिधींच्या शब्दालाही मान दिला नाही. एकीकडे जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी शिकवा यासाठी धडपड सुरू असून शिक्षण विभाग जोर देत आहे. तर दुसरीकडे शाळेत शिक्षकच नसताना विद्यार्थ्यांना शिकविणार कोण, एवढी साधी बाब मात्र त्यांच्या लक्षात येत नाही का असा सवाल पालक करीत आहेत. शिक्षणाधिकारी दिल्लीला जाऊन पुरस्कार घेतात. मात्र जिल्ह्यातील शाळेत सुरू असलेल्या या प्रकाराला घेऊन त्यांनी शाळेला भेट दिली नाही असे ही गावकरी बोलू लागले आहेत. शाळेत दोन शिक्षक प्रतिनियुक्तीवर ठेवण्यात आले आहेत. यावर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष भाऊलाल मोहने यांनी सर्व पदाधिकारी व अधिकाऱ्यांची भेट घेतली. मात्र त्याचा काहीच फायदा झाला नाही. करिता जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व सभापतींनी त्वरीत शाळेत शिक्षक द्यावे अन्यथा सर्व विद्यार्थी काढून बाहेर शिक्षणासाठी पाठविणार असा इशारा पालकांनी दिला आहे. २८ पालकांचे टीसी.साठी अर्ज ४आजघडीला शाळेत पहिलीची विद्यार्थी संख्या ‘शून्य’ असून दुसरीत- ९, तीसरीत-११, चौथीत- १३, पाचवीत-१३, सहावीत- ८ व सातवीत १२ विद्यार्थी आहेत. शाळेत बोटावर मोजण्या एवढी पटसंख्या आज शाळेत आहे. यातही २८ पालकांनी टिसी.साठी मुख्यापकांना अर्ज दिले आहेत. मात्र मुख्याध्यापकांनी पालकांची समजूत घालून टिसी. दिलेली नाही. यामुळे वेळीच शिक्षकांची पुर्तता न केल्यास शाळेला कुलूप लागणार असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
पहिल्या वर्गात विद्यार्थी ‘शून्य’
By admin | Published: July 07, 2017 1:29 AM