पॉझिटिव्ह स्टोरी
अमरचंद ठवरे
बोंडगावदेवी : डॉ. श्वेता कुलकर्णी यांच्या परिवारातील ५ जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्या सासूबाई कुंदा डोंगरवार या झरपडा गावच्या सरपंच आहेत. त्यासुद्धा कोरोनाबाधित असल्याने गृहविलगीकरणात होत्या. शुक्रवारी (दि.१४) त्या कोरोनावर मात करून कुटुंबात परतल्या. त्यांचे वडील प्रवीण कुलकर्णी कोरोनाबाधित असून, कोविड केंद्रामध्ये भरती आहेत. परिवारातील मंडळी कोरोनाबाधित असतानासुद्धा कर्तव्य हेच जीवन समजून त्या रजेवरसुद्धा गेल्या नाहीत. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील गावांना भेटी देऊन आपल्या अधीनस्त कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य ढळू दिले नाही. आधी रुग्णसेवानंतर कुटुंबसेवा हाच मूलमंत्र जपत आदर्श ठेवला.
अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील चान्ना येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. श्वेता कुलकर्णी कार्यरत आहेत. एकत्रित असलेल्या कुटुंबाची पूर्णत: जबाबदारी पेलवून कोरोनाच्या महामारीत आपल्या कर्तव्याला गालबोट लागू न देता रुग्णसेवेला प्राथमिकता देऊन कोरोनाच्या संसर्गाला थोपविण्यासाठी सदैव प्रयत्नरत आहेत. ग्रामीण भागातील जनतेला प्रतिबंधात्मक लस घेण्यासाठी त्या सदैव प्रवृत्त करतात.
प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत २३ गावांचा समावेश आहे. कार्यरत कर्मचाऱ्यांपैकी ८ कर्मचारी कमी असतानासुद्धा आपल्या कर्तव्यात त्यांनी कोणतीही कमतरता जाणवू दिली नाही. कोरोना चाचण्या नियमित होण्यासाठी आपल्या आरोग्य पथकाच्या सहकार्याने त्या सतत प्रयत्नरत आहेत. कोरोना महामारीच्या पहिल्याच टप्प्यात डाॅ. कुलकर्णी कोरोनाबाधित झाल्या होत्या. आपल्या एकुलत्या एक ३ वर्षांच्या बाळाचे संगोपन करूनसुद्धा त्यांनी आपल्या कर्तव्याचा विसर पडू दिला नाही. तालुक्यात पहिल्या प्रथमच जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यात कोविशिल्ड या प्रतिबंधात्मक कोरोना लसीचा पहिला व दुसरा डोस सर्वप्रथम घेऊन तालुक्यातील समस्त जनतेला लसीकरणाबाबत प्रवृत्त केले. ग्रामस्थांशी जवळीक साधून कोरोना चाचणी, तसेच लसीकरण करून घेण्यासाठी रणरागिणीसारख्या डॉ. श्वेता कुलकर्णी कार्य करताना दिसतात. तिसऱ्या लाटेची शक्यता पाहता लसीकरण गरजेचे असल्याचे त्या सांगतात. लहान मुलांना लसीकरण नसल्याने पालकांनी सावध राहून काळजी घेणे गरजेचे आहे. सतत संपर्कात राहून सर्वसामान्यांची काळजी घेणे, हेच आपले परमकर्तव्य असल्याचे त्या आवर्जून सांगतात.
.....
लसीकरण व चाचणीवर भर
वरिष्ठांकडून लस व चाचणी किट उपलब्ध होताच पीएचसीच्या कार्यक्षेत्रातील गावांमध्ये कोरोना चाचणी वेळोवेळी केली जाते. गावामध्ये मुनारी देऊन लस देण्याचा उपक्रम राबविला जात आहे. समाजमाध्यमांवरील अफवा कानी, मनी न घेता प्रतिबंधात्मक लस घेण्यासाठी पुढे यावे. लसीकरणाचे कुठलेही दुष्परिणाम नाहीत, असे त्या सातत्याने सांगत आहेत.