गोरेगाव : तालुक्यातील कलपाथरी मध्यम प्रकल्पात मासेमापी करताना काही मच्छिमारांना स्थानिक मच्छिमार व गावकऱ्यांनी पकडले. ठेकेदारांनी काही पोलिसांना नेऊन दमदाटी केल्याचा प्रकार घडला. या तलावात मासेमारी करण्यास बंदी असल्याची माहिती चोपा येथील देवेंद्र तामशेटवार यांना होती. स्थानिक कन्हारटोला येथील ढिवर समाजाच्या मच्छिमारांना दमदाटी केल्यावरुन ५० ते ६० ढिवर समाजातील नागरिकांनी आपला मोर्चा पोलिस स्टेशनकडे वळवला असता देवेंद्र तामशेटवार यांनी पं.स.सभापती दिलीप चौधरी, भाजपा तालुकाध्यक्ष डॉ. लक्ष्मण भगत, सरपंच कुसन भगत, उपसरपंच बरकत अली सैय्यद यांच्यासह पोलिस निरीक्षक सुरेश कदम यांची भेट घेऊन खरा प्रकार उघड करुन स्थानिक बेरोजगार ढिवर समाजाच्या मच्छिमारांना तलावाच्या नियोजित क्षेत्राबाहेर मच्छिमारी करण्याची परवानगी द्यावी असे मत व्यक्त केले. यावरून पोलीस निरीक्षक सुरेश कदम यांनी बैठक आयोजित करुन पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय नलावडे यांच्याकडे प्रकरण सुपूर्द केले. बैठकीला गोंदिया मत्स्य व्यवसाय सहा.आयुक्त समीर जफरुल परवेज, ठेकेदार अशफाक खान, युसूफ धान, कुसन भगत, उपसरपंच बरकत अली सैय्यद व देवेंद्र तामसेटवार यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन पोलिस व मत्स्य व्यवसाय सहा. आयुक्तांनी प्रकरणाचा सोक्षमोध लावला व नियोजित क्षेत्रात मच्छिमारी करण्यास बंदी असल्याचे सांगून मच्छिमारी करताना यापुढे कुणीही आढळल्यास त्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल असे स्पष्ट केले. या तलावात मच्छिमारीचे प्रकरण उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर येथे प्रलंबित आहे. सदर प्रकरणी प्रादेशीक उपआयुक्त मत्स्य व्यवसाय नागपूर यांचे २/१२/२०१६ चे पत्रानुसार मुंबई उच्च न्यायालयाच्या पुढील निर्णयापर्यंत कलपाथरी जलाशयात कुणाही मक्तेदाराला सुद्धा मासेमारी करण्यास परवानगी स्थगित ठेवली आहे. तसे पत्र गोरेगाव पोलीस स्टेशनला दिले आहे. देवेंद्र तामसेटवार यांनी स्थानिक बेरोजगार ढीमर समाजाला न्याय देण्यासाठी त्यांना जलाशयाच्या क्षेत्राबाहेर मच्छिमारी करण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी केली. यावर मत्स्य व्यवसाय सहाय्यक आयुक्तांनी पाटबंधारे विभागाकडून माहिती द्यावी असे सुचविले. (शहर प्रतिनिधी)
कलपाथरी प्रकल्पातील मासेमारी वादाच्या भोवऱ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2017 12:13 AM