अर्जुनी मोरगाव : मासेमारीसाठी जाळे टाकण्याकरिता नावेतून तलावात गेलेल्या इसमांवर वीज कोसळल्याने नावाड्याचा मृत्यू झाला तर तिघे जण बचावले. ही दुर्घटना बुधवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास नवेगावबांध तलावात घडली. मृतक इसमाचे नाव सुखराम मारोती कांबळे (५५, रा. येलोडी) असे आहे.
मासेमारीसाठी जाळे टाकण्याकरिता नावेत बसून चार जण बुधवारी नवेगावबांधच्या तलावात गेले होते. अचानक विजेचा कडकडाट व वादळी वारा सुरू झाला. नाव बाहेर काढण्याच्या प्रयत्नात असतानाच वीज कोसळली. नावेत चार व्यक्ती होत्या. मृतक हाच नाव हाकत होता. तर मृतकाचा मुलगा विलास सुखराम कांबळे (२५), दिलीप भूमके (२६) व जितेंद्र भूमके (३०) हे तिघे जण नावेत पाठीमागे काही अंतरावर बसले होते. तिघांना किरकोळ इजा झाली. मृतक हा मत्स्य व्यवसाय संस्थेचा सभासद होता. बारमाही मासेमारीवरच मृतकाच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होत होता. नवेगावबांधच्या ग्रामीण रुग्णालयात मृतकाची उत्तरीय तपासणी करण्यात आली. तलाठ्याने तहसीलदार विनोद मेश्राम यांना पंचनामा तयार करून अहवाल सादर केला.