लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : बनावट नोटांचा काळाबाजार करणाऱ्या ७ जणांना गोंदिया व बालाघाट पोलिसांनी संयुक्त कामगिरी करीत रविवारी (दि.२७) अटक केली आहे. यामध्ये त्यांच्याकडून पाच कोटी रूपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये ५ आरोपी बालाघाट येथील तर २ आरोपी गोंदिया येथील आहेत. यावरून पोलिसांनी नक्षली कनेक्शन असल्याचा संशय व्यक्त केला आहे.
बालाघाटचे पोलीस अधीक्षक अभिषेक तिवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, बैहर व बालाघाट येथे बनावट नोट चालविल्या जात असल्याच्या तक्रारी येत होत्या. यावर मागील २ दिवसांपासून बैहर पोलिसांसोबत ऑपरेशन राबविले जात होते. अशात बालाघाट येथून राहुल घनश्याम मेश्राम (२५), अनंतराम जंगली पांचे (३८), हरिराम रामेश्वर पांचे (३३), नन्हूलाल किशन विश्वकर्मा (४०), हेमंत आत्माराम (४०, सर्व रा.किरनापूर) यांना आठ लाख रूपयांच्या बनावट नोटांसह पकडण्यात आले.
विचारपूस केली असता त्यांनी गोंदिया जिल्ह्यातून बनावट नोटांचा सप्लाय होत असल्याचे सांगीतले. यानंतर बालाघाट पोलिसांनी गोंदिया पोलिसांच्या मदतीने मुकरू उर्फ मुकेश वकटू तवाडे (३०) व रामू उर्फ रामेश्वर रंगलाल मौजे (४०,रा. गोंदिया) यांना अटक केली आहे. त्यांना या बनावट नोटा कोठून व कधीपासून होत आहे याबाबत विचारणा सुरू आहे. विशेष म्हणजे, मार्च महिन्यात बैहर पोलीस ठाण्यांतर्गत मुक्की रोडवरील बाम्हणी चौकात पोलिसांनी बनावट नोट चालविण्याच्या प्रयत्नात असलेल्या ४ जणांना अटक केली होती. पोलीस अधीक्षक तिवारी यांच्यानुसार या प्रकरणाशी त्यांची लिंक असून ही एकच टोळी असल्याची शक्यता व्यक्त केली आहे.
दहा रुपयांपासून २ हजार रुपयापर्यंतची नोटजप्त करण्यात आलेल्या नोटांमध्ये १० रूपयांपासून दोन हजार रूपयांपर्यंतच्या नोटांचा समावेश आहे. त्यात दोन हजार रूपयांच्या नोटा जास्त असून एवढ्या मोठ्या प्रमाणात नोटा बनविण्यासाठी स्कॅनर व कलर प्रिंटर वा अन्य कोणत्या मशिनचा वापर केला जात आहे याचा तपास पोलीस करीत आहे. बनावट नोटांचा कारभार किरनापूर व गोंदिया जिल्ह्याशी जुळलेला असल्याची माहिती असल्याने पोलिसांचे वेगवेगळे पथक त्या दिशेने टोळीच्या मुख्य आरोपीच्या शोधात कार्यरत आहे.
जगदलपूर येथे मिळाले होते ७.९ कोटींच्या बनावट नोटा
बालाघाट येथून सुमारे ४०० किलोमीटर अंतरावर छत्तीसगड राज्यातील जगदलपूर येथे ३ मार्च रोजी सात कोटी ९० लाख रूपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या होत्या. या नोटा जगदलपूर येथून विशाखापट्टनम येथे पोहचविल्या जात होत्या. ओडिसा पोलिसांनी तपासणी दरम्यान एका फोर्ड कारमधून चार ट्रॉली बॅगसोबत ३ जणांना अटक केली होती. बॅगमध्ये ५०० रूपयांच्या नोटांसह १५८० बंडल होते. त्यानंतर ११ मार्च रोजी बैहर येथे चार लाख रूपयांपेक्षा जास्तीच्या बनावट नोटा पोलिसांनी जप्त केल्या होत्या.