गोंदिया : बिरसी विमानतळावरून १३ मार्चपासून प्रवासी विमान वाहतूक सेवेला प्रारंभ झाला. मात्र खराब हवामानामुळे मागील १२ दिवसांच्या कालावधीत तब्बल पाचवेळा विमानाला विलंब झाला. परिणामी त्याचा प्रवाशांना फटका बसला. विमानाला विलंब होण्यास खराब वातावरण पुढे केले जात असले तरी, या विमानतळावरून प्रशिक्षणार्थी पायलट नियमित उड्डाण घेत असल्याने दिल्या जाणाऱ्या कारणावर शंका व्यक्त केली जात आहे.
बिरसी विमानतळावरून १३ मार्चपासून हैदराबाद-गोंदिया-इंदूर व इंदूर-गोंदिया-हैदराबाद अशी विमानसेवा सुरू करण्यात आली. ही सेवा सुरू होऊन १२ दिवसाचा कालावधी पूर्ण झाला असून, तब्बल पाचवेळा खराब हवामानामुळे या विमानतळावर विमान उतरण्यास परवानगी देण्यात आली नाही. गुरुवारी (दि.२४) दुपारी १.३० वाजतापर्यंत प्रवासी इंदूरला पोहोचूू शकले नाही. बिरसी विमानतळावर विमान उतरविण्याची परवानगी न मिळाल्याने, हे विमान एक ते दीड तास हवेतच होते. त्यानंतर हे विमान थेट इंदूरला गेले. परिणामी, गोंदियावरून इंदूरला जाणाऱ्या २५ प्रवाशांना बिरसी विमानतळावरून घरी परतावे लागले.
हैदराबादवरून गोंदियाला सकाळी ८.१० ला विमान पोहोचण्याची वेळ असून, त्यानंतर हेच विमान ८.३५ वाजता इंदूरला जाते. त्यानंतर इंदूरहून सकाळी १०.२० वाजता उड्डाण घेऊन गोंदियाला ११.३५ वाजता पोहोचते. मात्र पाचवेळा तब्बल विमानाला विलंब झाल्याने दिल्ली, अहमदाबाद व चेन्नई येथे जाणाऱ्या प्रवासी विमानाला विलंब झाल्याने कनेक्टिंग विमान पकडू शकले नाही. तर शुक्रवारी(दि.२५)सुद्धा हैदराबादहून येणारे विमान दुपारी १२ वाजता बिरसी विमानतळावर पोहोचले.
इन्स्ट्रूमेंट लँडिंगची सुविधा नाही
बिरसी विमानतळावरुन इन्स्ट्रूमेंट लँडिंगची सिस्टम(आयएलएफ)ची व्यवस्था नसल्याने खराब वातावरणात विमान उतरविले जात नाही. बिरसी येथील पायलट प्रशिक्षण केंद्र असून, पायलट दररोज सकाळी नियमित उड्डाण घेत आहे. विशेष म्हणजे, हिवाळ्यात काही शहरांमध्ये धुक्याची समस्या राहते. मात्र गोंदिया विमानतळावर ही समस्या येत नाही. मात्र प्रवासी विमान वाहतूक सेवेला खराब वातावरणाचा फटका बसत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
खराब वातावरणामुळेच विमानास लँडिंग करण्यास विलंब होत आहे. प्रवाशांची सुरक्षा महत्त्वपूर्ण आहे. पण प्रवाशांना होत असलेल्या त्रासाबद्दल खंत आहे.
- देवेंद्र गोस्वामी, प्रभारी संचालक बिरसी विमानतळ.