गोंदिया : कोरोनाचा संसर्ग आणि राज्यस्तरीय पर्यावरण समितीची मंजुरी न मिळाल्याने जिल्ह्यातील एकाही रेती घाटांचे लिलाव मागील वर्षी झाले नाहीत. त्यामुळे या संधीचा रेती माफियांनी फायदा घेत मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी केली. एका तालुक्यातील रेती घाटावरून दररोज पाचशे ट्रक रेतीची तस्करी झाली. याबाबतच्या तक्रारीची १० पत्रेसुद्धा प्रशासनाला दिली, पण त्यांनी कसलीच दखल घेतली नसल्याबद्दल आ. परिणय फुके यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुद्दा उपस्थित करून रोष व्यक्त केला.
मुंबई येथे सध्या विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात आ. परिणय फुके यांनी जिल्ह्यातील रेती तस्करीचा मुद्दा उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधले. तसेच गोंदिया-भंडारा जिल्ह्यात १०० कोटी रुपयांच्या रेतीची तस्करी होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. रेती तस्करीसंदर्भात अनेकदा तक्रारी करूनसुद्धा त्याची दखल घेतली जात नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. आ. फुके यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर मंत्र्यांनी चुकीची माहिती दिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. रेती तस्करीसंदर्भात अनेक तक्रारी असताना केवळ २ प्रकरणांत कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले. रेती तस्करीच्या प्रश्नावर दोन आमदारांनी उपोषण करूनसुद्धा प्रशासनाने हे प्रकरण गांभीर्याने घेतले नाही. प्रशासनच रेती माफियांना पाठीशी घालत असल्याचा आरोप आ. फुके यांनी केला.