गोंदिया : शहरातील जयश्री टॉकीजच्या जवळील श्री गजानन ट्रेडर्स मधून किराणा साहित्य घेणाऱ्या दोन अनोळखी तरुणांनी गोंदियातील पाच व्यापाऱ्यांची फसवणूक केली. आरोपी २० ते २२ वर्ष वयोगटातील आहेत. गोंदियातील व्यापाऱ्यांकडून तेल घेण्याच्या नावावर त्यांची फसवणूक केली आहे.
आरोपी तरुणांनी नितीन अग्रवाल यांच्याकडून पाच टिन तेल खरेदी केले. ते तेल ९ हजार २२५ रुपयाचे होत असतांना आरोपींनी दहा हजार रुपये टाकल्याचे दाखवून उलट त्यांच्याकडून ७५० रुपये घेतले. अरुण लालचंद प्रथ्यानी यांच्याकडून ५ टिन तेल २०३० रुपये प्रमाणे घेतले. १० हजार १५० रुपये त्या तेलाचे होत असताना आरोपींनी १५ हजार रुपये ऑनलाईन पे केल्याचे दाखवून त्यांच्याजवळून ४ हजार ८५० रुपये परत रोख घेतले आणि ते तेलाचे टिन घेऊन गेले.
समीर तिगाला यांच्याकडून ४ टीन तेल १८७५ रुपयाच्या भावाने घेतले. त्याचे ७ हजार ५०० किंमतीचे घेतले. राजेश गुप्ता यांच्याकडून १८३० रुपयाच्या हिशेबाने पाच टिन तेल किंमत ९ हजार १५० रुपयाचे घेतले. परंतु त्यांनाही जास्त पैसे टाकल्याचे भासवून त्यांच्याकडून १ हजार ८५० रुपये परत घेतले. संतोष जायस्वाल यांच्याकडून ५ टिन तेल १९०० रुपयाच्या भावाने खरेदी केले. त्याचे ९ हजार ५०० रुपये असा एकूण पाच व्यापाऱ्यांची ५३ हजाराने फसवणूक केली. या घटने संदर्भात २४ एप्रिल रोजी गोंदिया शहर पोलिसांनी त्या दोन अनोळखी तरुणांवर भादंविच्या कलम ४२०, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस हवालदार सतीश शेंडे करीत आहेत.