आमगाव : चोरीच्या प्रकरणात अटकेत असलेल्या कुंभारटोलीतील आरोपी राजकुमार अभयकुमार धोती (३०) याच्या पोलीस कोठडीतील मृत्यू प्रकरणाचा तपास आता सीआयडीने आपल्या हाती घेतला आहे. त्यानंतर आता या प्रकरणात पाच जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील एक पोलीस उपनिरीक्षक अद्याप पसार आहे.
स्थानिक गुन्हे शाखेने चोरीच्या प्रकरणात राजकुमार अभयकुमार धोती, सुरेश धनराज राऊत, राजकुमार
गोपीचंद मरकाम व एका अल्पवयीन आरोपीला २० मे रोजी ताब्यात घेतले होते. त्यानंतर अल्पवयीन आरोपीला वगळून तिघांना अटक केली होती व २१ मे रोजी स्थानिक गुन्हे शाखेने आमगाव पोलीस ठाणेला या आरोपींना सोपविले होते. त्याचदिवशी आमगाव ठाणे पोलीस कोठडीत शनिवारी (दि. २२) पहाटे ५ :१५ वाजता राजकुमार धोती याचा संशयास्पद मृत्यू झाला होता. या प्रकरणात पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण, सहायक पोलीस निरीक्षक महावीर जाधव, पोलीस हवालदार खेमराज खोब्रागडे, अरुण उके, दत्तात्रय कांबळे यांच्याविरोधात भादवी कलम ३०२, ३३०, ३४ अंतर्गत गुन्हा नोंद करून अटक करण्यात आली. यातील पोलीस उपनिरीक्षक जाधव पसार असून त्याला अटक करण्यात आलेली नाही.
या प्रकरणाचा तपास सीआयडीच्या पोलीस अधीक्षक राजलक्ष्मी शिवणकर व पोलीस निरीक्षक चंद्रकांत सूर्यवंशी करीत असून आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.