लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : देवरी तालुक्यातील चिचगड येथे बंदोबस्तासाठी नागपूर येथून आलेले भारतीय राखीव बटालीयन ई कंपनी १५ च्या दोन जवानांसह एकूण पाच जणांचे स्वॅब नमुने गुरूवारी कोरोना पॉझिटिव्ह आले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्ण वाढीचा वेग कायम असल्याचे चित्र आहे. तर ९ कोरोना बाधित कोरोनामुक्त झाल्याने जिल्हावासीयांना थोडा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात सध्या स्थितीत एकूण ३५ कोरोना अॅक्टीव्ह रुग्ण आहेत.देवरी तालुक्यातील चिचगड येथील पोलीस स्टेशनच्या कॅम्पमधील नागपूर येथून आलेल्या भारतीय राखीव बटालीयन ई कंपनी १५ एकूण ४० जवानांचे स्वॅब नमुने गुरूवारी (दि.१६) रॅपिड अँटीजन चाचणी अंतर्गत तपासणी करण्यात आले. त्यात या दोन्ही जवानांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. इतर जवानांचे नमुने कोरोना निगेटिव्ह आले. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून या दोन्ही जवानांच्या संपर्कात आलेल्यांना क्वारंटाईन करुन त्यांचे स्वॅब नमुने घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे यापूर्वी गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील जवानांना सुध्दा कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर आता चिचगड येथील दोन जवानांचे नमुने कोरोना पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान हे जवान नुकतेच चिचगड येथे रुजू होण्यासाठी आल्याची माहिती आहे. त्यामुळे त्यांच्या प्रवासाची हिस्ट्री तपासली जात असल्याची माहिती आहे. गुरूवारी कोरोना पॉझिटिव्ह आलेले इतर तीन रुग्ण हे गोंदिया शहरातील आहे. त्यामुळे गोंदिया शहरात आता कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे चित्र आहे.
याच पार्श्वभुमीवर जिल्हा प्रशासनाने कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शहरातील कुंभारेनगर परिसरात प्रायोगिक तत्वावर रॅपिड अँटीजन तपासणी करण्यास सुरूवात केली आहे.या माध्मातून आतापर्यंत ७५ जणांच्या स्वॅब नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यात हे सर्व स्वॅब नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहे.जिल्ह्यात कोरोना वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता जिल्हा प्रशासनातर्फे विविध उपाययोजना सुरू आहे.१७४ स्वॅब नमुन्यांचा अहवाल प्राप्तकोरोना संसर्गाच्या अनुषंगाने संशयितांचे स्वॅब नमुने घेवून ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले जातात. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ६६८१ जणांचे स्वॅब नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यापैकी २२६ स्वॅब नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले. तर ६१९७ स्वॅब नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहे. तर १७४ स्वॅब नमुन्यांचा अहवाल अद्याप गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून जिल्हा आरोग्य विभाग व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला प्राप्त व्हायचा आहे. ८६ स्वॅब नमुन्यांचा अहवाल अद्यापही अनिश्चित आहे.जिल्ह्यात आता ३५ कोरोना अॅक्टीव्ह रुग्णजिल्ह्यात मागील दहा बारा दिवसांपासून कोरोना बाधित रुग्ण वाढीचा वेग कायम आहे. गुरूवारी पुन्हा पाच कोरोना बाधितांची भर पडल्याने जिल्ह्यातील कोरोना अॅक्टीव्ह रुग्णांचा आकडा ३५ वर पोहचला आहे. तर आतापर्यंत एकूण १८६ कोरोना बाधित कोरोनामुक्त होवून आपल्या घरी परतले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण २२६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून तीन कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.